बिहारमधील पुराला उंदीर कारणीभूत असल्याच्या बिहारच्या मंत्र्यांच्या विधानाचा राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी समाचार घेतला आहे. बिहारचे जलसंधारण मंत्री लल्लन सिंह यांनी उंदरांनी बिहारच्या किनारपट्टीचे नुकसान केल्याने पूर आला, असे वक्तव्य केले होते. यावर लालूप्रसाद यादव यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. बिहारमधील पूर दोन पायाच्या उंदरांमुळे आला की चार पायांच्या उंदारांमुळे आला ? कोणत्या उंदरांनी किनारपट्टीच्या निर्मितीसाठी खर्च केलेले हजारो कोटी रूपये खाल्ले?, हे नितीश कुमार यांनीच सांगावे, असा प्रश्न विचारला.

लालूंनी याप्रकरणी एकामागोमाग ट्विट करून नितीश कुमार सरकारवर टीकास्त्र सोडले. या पुराला नितीश कुमार नव्हे तर उंदीर जबाबदार आहेत. नितीश तर नैतिकतेच्या नशेत हरपून गेले असून ते अंतरात्माशी चर्चा करण्यात व्यस्त आहेत, जय हो चुहा सरकार की.., असा टोलाही त्यांनी लगावला.

हजारो टन दारू गायब झाली, त्यालाही उंदीर जबाबदार. पुरात हजारो लोक दगावले, त्यालाही उंदीर जबाबदार. हे तर उंदीर नव्हे नितीश सरकारच्या बळीचे बकरे झालेत. पुढे ते म्हणतात, तुम्हाला माहीत आहे का बिहारमध्ये पूर उंदरांमुळे आला आहे. माहीत नसेल तर लगेच जाणून घ्या. नितीश सांगतील उंदरांनी बिहारमध्ये पूर कसा आणला…

बिहारचे जलसंधारण मंत्री लल्लनसिंह यांनी बिहारच्या किनारपट्टीचे उंदरांनी नुकसान केल्यामुळे गावांमध्ये पाणी घुसल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षांनी नितीश कुमार सरकारला धारेवर धरले आहे.