राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. राज्यातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि महादलितांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यावरून नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच जर दलित आणि गरिबांना काही झाले तर नितीश कुमार तुमची खुर्ची शाबूत राहणार नाही, असा इशाराच दिला.

तेजस्वी यादव यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत नितीश कुमारांना झोडपले. नितीश कुमार नीट ऐका, जर राज्यातील दलित आणि गरिबांना काही झाले तर तुमची खुर्ची शाबूत राहणार नाही. तत्पूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, नितीश कुमार राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. कायद्याचे रक्षक भक्षक बनून नागरिकांना मारत आहेत. मागील २० डिसेंबरला कैमूल जिल्ह्यात आदिवासी समाजातील एका निर्दोष व्यक्तीला चेरा पोलिसांनी पकडून त्याची हत्या केली.

नितीश कुमार यांनी विकास कार्याच्या समीक्षा यात्रेऐवजी पश्चाताप यात्रा काढावी असा सल्ला देत तुमच्या यात्रेला सर्वच जिल्ह्यांमध्ये इतका विरोध का होत आहे, असा सवालही विचारला. प्रत्येक ठिकाणी आपल्याला इतका विरोध का होत आहे, याचे नितीश कुमारांनी आत्मचिंतन करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला.

विरोधी पक्षनेते असलेले तेजस्वी यांनी काही दिवसांपूर्वी बक्सरमधील एका गावात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा गुप्तचर विभागाचे अपयश असल्याचे म्हटले होते. संयुक्त जनता दलाचे (संजद) लोक सरकारचे अपयश लपवण्यासाठी राजदवर आरोप करत आहेत. जर आम्ही दोषी आढळलो तर सरकारने कारवाई करावी. आम्हाला तुरूंगात पाठवावे आणि जर कायदा व सुव्यवस्था सुधारता येत नसेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.