सासराम, बिहार : एका व्यक्तीने इतर दोन साथीदारांसह बिहारमधील रोहतस जिल्ह्य़ात रेल्वे कर्मचाऱ्यांकडून २४ लाख  रूपये लुटण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्या वीस वर्षांच्या व्यक्तीला ठेचून ठार मारले. राज्यात आठवडाभरातील अशी तिसरी घटना आहे. सासराम रेल्वे स्टेशनच्या कर्मचाऱ्यांकडून लुटारूंनी पैसे लुटण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांनी लोकांना घाबरवण्यासाठी गोळीबार केला असता त्यात एक महिला जखमी झाली, असे पोलिस अधिकारी आर.बी.पासवान यांनी सांगितले.

बुकिंग असिस्टंट अशोक कुमार व सुपरवायजर शैलेश कुमार हे आनंदी मार्केट येथील बँकेत भरण्यासाठी २४.७८ लाख रूपये घेऊन जात असताना हा प्रकार घडला . हे पैसे सासराम स्टेशनवर रेल्वे तिकीट विक्रीतून मिळाले होते. तीन जण मोटारसायकलवर आले व त्यांनी अशोक कुमार यांच्याकडून पैशांची बॅग हिसकावली. प्रतिकार केला असता चोरटय़ांनी गोळीबार केला, पण गोळी लाली कन्वर या महिलेस लागली त्यात ती जखमी झाली. या वेळी दोघे हल्लेखोर फरार झाले व एक जण जमावाच्या हाती लागला. त्याला लोकांनी मारहाण केली नंतर त्याचा रूग्णालयात मृत्यू झाला. जखमी महिला व हल्ला झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना रूग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही चित्रण पाहिले जात असून दोघा फरारी दरोडेखोरांचा शोध जारी आहे.