झिम्बाब्वेतील ३७ वर्षांची राजवट संपुष्टात; देशभरात जल्लोष

झिम्बाब्वेच्या संसदेत महाभियोगाची कारवाई सुरू झाल्यानंतर अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी अखेर मंगळवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे देशाने १९८० साली ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळवल्यापासून सुरू झालेली ३७ वर्षांची मुगाबे यांची राजवट संपुष्टात आली आहे.

काही दिवसांपूर्वी ९३ वर्षीय मुगाबे यांनी त्यांचे स्वातंत्र्यलढय़ापासूनचे सहकारी आणि देशाचे उपाध्यक्ष इमर्सन नान्गाग्वा (वय ७५) यांची पदावरून हकालपट्टी केली होती. नान्गाग्वा यांनी दक्षिण आफ्रिकेत आश्रय घेतला होता. मुगाबे यांची पत्नी ग्रेस (वय ५२) या अध्यक्षपद मिळवण्यासाठी उत्सुक होत्या आणि त्यांचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू होते. मात्र नान्गाग्वा यांना लष्कर, राजकीय नेते आणि सामान्य जनतेतून मोठा पाठिंबा होता. त्यानंतर मुगाबे यांनी लष्करप्रमुख जनरल कॉन्स्टन्टिनो चिवेंगा यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे गेल्या मंगळवारी रात्री लष्कराने देशाची सूत्रे हाती घेतली. लष्कराने मुगाबे यांना पायउतार होण्यास सांगितले. पायउतार न झाल्यास मुगाबे यांच्या पक्षाने महाभियोगाच्या कारवाईस सामोरे जाण्यास सांगितले. मात्र, मुगाबे यांनी सोमवारीच देशाचे अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला. त्यानंतर मुगाबे यांच्या झानू-पीएफ या राजकीय पक्षाने त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवले आणि ग्रेस यांचीही पक्षातून हकालपट्टी केली. दरम्यान, देशात नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात मुगाबे यांच्याविरोधात रस्त्यांवर उतरून आंदोलन सुरू केले होते. देशात परतलेल्या नान्गाग्वा यांनीही मंगळवारी मुगाबे यांना राजीनाम्याची विनंती केली, तरीही मुगाबे पद सोडण्यास तयार नव्हते.

अखेर मंगळवारी संसदेने मुगाबे यांच्याविरुद्ध महाभियोगाच्या कारवाईस सुरुवात केली. महाभियोगाचा प्रस्ताव संसदेत मांडण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे आजवर झानू-पीएफ पक्षाचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या  ‘मूव्हमेंट फॉर डेमोक्रॅटिक चेंज’ या विरोधी पक्षानेही त्याला अनुमोदन दिले. महाभियोगाच्या प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरू होणार इतक्यात मुगाबे यांचा दूत त्यांचा राजीमाना घेऊन आला आणि संसदेचे अध्यक्ष जेकब मुदेंदा यांच्याकडे तो दिला. त्यांनी तो संसदेत वाचून दाखवला आणि त्यानंतर प्रतिनिधींनी जल्लोषात या घटनेचे स्वागत केले. झिम्बाब्वेच्या नागरिकांच्या भल्यासाठी आणि देशात शांततामय मार्गाने सत्तांतर होण्यासाठी राजीनामा देत असल्याचे मुगाबे यांनी म्हटले आहे.

यानंतर नान्गाग्वा हे झिम्बाब्वेचे नवे अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. लष्कराने मंगळवारी सकाळी मुगाबे यांना त्यांच्या विनंतीप्रमाणे मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची परवानगी दिली होती. मात्र त्या बैठकीला केवळ पाच मंत्री उपस्थित राहिले, बाकीचे १७ मंत्री संसदेत महाभियोगाच्या कारवाईला हजर राहिले होते.