मायावती, सीताराम येचुरींचे टीकास्त्र; काँग्रेसकडून स्मृती इराणींच्या माफीची मागणी

हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी राज्यसभेत शुक्रवारी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी व बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तसेच स्मृती इराणी व माकपचे सीताराम येचुरी यांच्यातही संघर्ष झाला. रोहित वेमुलाला आत्महत्या करण्यास भाग पाडले असा आरोप येचुरी यांनी केला. ही हत्याच आहे अशी टीका त्यांनी केली.

रोहित वेमुला आत्महत्येची चौकशी करणाऱ्या आयोगात दलित व्यक्ती नसल्याचा मुद्दा मायावतींनी उपस्थित केला होता. एकसदस्यीय आयोगाचे अशोक कुमार रुपनवाल उच्चवर्णीय असल्याची मायावतींची तक्रार होती. सरकारने आयोगातील सदस्यांची संख्या वाढवावी अशी मागणी करत, मंत्र्यांनी प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. तेव्हा आता त्या दोन दिवसांपूर्वी शिर कापून देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करणार काय असा सवाल मायावतींनी केला. माझ्या उत्तराने तुमचे समाधान झाले नाही तर शिर कापून देईल असे भावनिक आवाहन स्मृती इराणींनी केले होते. त्यावरून मायावतींनी टीका केली. संघाच्या व्यक्तींना वाचवण्याचा सरकारचा उद्देश असल्याचा आरोपही मायावतींनी केला.

येचुरींची टीका

स्मृती इराणी यांनी रोहित वेमुलाने डाव्या पक्षांवर टीका केल्याचे सांगताना त्याच्या फेसबुक पोस्टचा हवाला दिला होता. मात्र सीताराम येचुरी यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्याची सत्यता पडताळून पाहिली आहे काय असा प्रश्न त्यांनी विचारला. टीकेला माझा आक्षेप नाही. मात्र सत्यता न पडताळता मंत्र्यांनी बोलणे चुकीचे आहे. त्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हस्तक्षेप केला. स्मृती इराणी यांचा प्रत्येक शब्द विद्यापीठाच्या रजिस्ट्रारकडून तपासल्याचे सांगितले. त्यावर सरकारने नेमलेल्या व्यक्तींकडूनच त्याची सत्यता पडताळल्याचा टोला येचुरी यांनी लगावला.

राज्यसभा उपाध्यक्ष पी.जे.कुरियन यांनी त्याबाबत सत्यता पडताळण्याचे आश्वासन येचुरी यांना दिले.

रोहित वेमुलाचे पाठय़वेतन थांबवण्यात आले नव्हते तर काही कादगपत्रे त्याला सादर करायला सांगण्यात आल्याचे उत्तर इराणी यांनी दिले. तसेच हैदराबाद विद्यापीठाच्या राजशिष्टाचार मंडळावर एकही दलित नसल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. रोहित वेमुलाच्या आईने घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. सरकार आत्महत्येमागील कारणे शोधत आहे असे स्पष्ट केले.

मंत्र्यांच्या माफीची मागणी

स्मृती इराणी यांनी राज्यसभेत देवाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र मी कसलाही अपमान केला नसून केवळ त्याबाबत पत्रक वाचले असा बचाव स्मृती इराणी यांनी केला. काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. जनता दलाच्या के.सी.त्यागी यांनीही शर्मा यांना पाठिंबा देत मंत्र्यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली.