रोहित शेखर याचे पत्नीशी संबंध सौहार्दाचे नव्हते तो त्याची राजकीय कारकीर्द सुरू होत नसल्याबाबत निराश होता, असे त्याच्या आईने म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री एन.डी. तिवारी यांचा मुलगा असलेल्या रोहित शेखर याचा मंगळवारी मृत्यू झाला होता पण त्याचा खून झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्याबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी शेखर याच्या कुटुंबीयांचे जाबजबाब घेतले असून त्यात पत्नी व घरातील नोकरांना प्रश्न विचारण्यात आले. पोलिसांच्या मते घरातील व्यक्तीनेच त्याचा खून केला आहे. शेखर याच्या सासऱ्यांनी सांगितले की, माझी कन्या असे काही करणार नाही. शेखरच्या मृत्यूबाबत समजले तेव्हा मी तेथे आलो होतो. पोलिस आता चौकशी करीत आहेत, त्यातून शेखरचा मृत्यू कसा झाला हे समजेल. शेखर याला मंगळवारी दक्षिण दिल्लीत साकेत येथील मॅक्स रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आले होते.

उज्ज्वला तिवारी यांनी सांगितले की, शेखर याने अलिकडे त्याचे वडील व माजी केंद्रीय मंत्री एन. डी. तिवारी यांच्यावर जिथे अंत्यसंस्कार करण्यात आले तिथे भेट दिली होती. शेखर याच्या मृत्यूबाबत दिल्ली पोलिसांनी गुरुवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे कारण त्याच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्याचा मृत्यू गळा दाबल्याने गुदमरून झाला आहे. हे प्रकरण गुन्हे अन्वेषण खात्याकडे तपासासाठी देण्यात आले आहे.

शेखरची आई उज्ज्वला हिने सांगितले की, माझ्या मुलाचा खून झाला हे धक्कादायक आहे. रोहित मंगळवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत झोपला पण तो उठलाच नाही. शेखर (वय ४०) व त्याची पत्नी यांचे संबंध सौहार्दाचे नव्हते. विवाहाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्यात कुरबुरी होत्या.

शेखर व त्याची आई हे ११ एप्रिलला मतदानासाठी हल्दवानी येथे गेले होते. ते १२ एप्रिलला दिल्लीत परतणे अपेक्षित होते.नंतर त्यांनी शेखरला काही लोकांना भेटायचे आहे, असे सांगितल्याने योजना बदलली होती. शेखर हा त्याच्या वडिलांवर अंत्यसंस्कार झाले, त्या चित्रशाळा घाटावर गेला होता, तो व त्याची आई राणीबाग येथे एका छोटय़ा रिसॉर्टमध्ये राहत होते, नंतर नीम करोली बाबा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेल्यानंतर ‘माझी राजकीय कारकीर्द का उभी राहत नाही’ असा प्रश्न त्याने आईला केला होता. १५ एप्रिल रोजी मायलेक दिल्लीत परत आले, त्या वेळी शेखर त्याच्या डिफेन्स कॉलनी येथील निवासस्थानी गेला. त्याची आई उज्ज्वला ही टिळक लेन येथील घरी गेली. नंतर ती परत आली तेव्हा तिने शेखरची पत्नी अपूर्वा हिला त्याच्याबाबत विचारले असता तो दमल्यानंतर जेवून झोपल्याचे सांगितले. दरम्यान शेखर खाली आला, तो दमलेला दिसत होता. आईने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला कारण त्याच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. काही माध्यमांनी तो दारू प्यायल्याचे म्हटले होते पण तशी परिस्थिती नव्हती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही कारणास्तव असल्याने शेखरची आई उज्ज्वला ही मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. त्यापूर्वी अपूर्वाने तिला पुन्हा शेखर हा झोपला असल्याचे सांगितले होते नंतर मॅक्स हॉस्पिटलमध्ये उज्ज्वला यांच्याबरोबर राजीवजी नावाची व्यक्ती होती. त्यांना शेखरच्या घरून फोन आला. त्याने शेखर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. शेखरवर पूर्वी उपचार करणाऱ्या सुमित सेठी यांना फोन करून त्याची आई घरी पोहोचली होती पण शेखरची परिस्थिती पाहता तो वाचण्याची चिन्हे नव्हती. अपूर्वावर विश्वास ठेवून शेखरच्या आईने तिला प्रश्न केले नाहीत. २०१८ मध्ये शेखर व अपूर्वा यांचा प्रेम विवाह झाला होता.