11 December 2017

News Flash

‘विश्वरूपम’चा वाद निवळणार?

कमल हसन यांच्या ‘विश्वरूपम’ चित्रपटावरून सुरू असलेला वाद आता निवळू लागला आहे. मुस्लीम समाजाच्या

पीटीआय, चेन्नई | Updated: February 1, 2013 4:08 AM

कमल हसन यांच्या ‘विश्वरूपम’ चित्रपटावरून सुरू असलेला वाद आता निवळू लागला आहे. मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्यामुळे तामिळनाडू सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. या बंदीमुळे आपण कमालीचे दुखावले गेल्याचे स्पष्ट करीत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. चित्रपटावर बंदी घातल्याच्या निर्णयाचा निषेध करीत हिंदूी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी कमल हसन यांना पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, चित्रपटात आक्षेपार्ह चित्रण असल्यास उत्तर प्रदेशमध्येही ‘विश्वरूपम’वर बंदी घातली जाईल, असे सत्ताधारी समाजवादी पक्षाने जाहीर केल्यामुळे ‘विश्वरूपम’चा वाद आणखी चिघळण्याची शक्यता होती. मात्र गुरुवारी संध्याकाळी वादविरोधी चित्र निर्माण झाले.

बंदीमुळे दुखावला गेलोय – कमल हसन
तामिळनाडू सरकारने ‘विश्वरूपम’ चित्रपटावर बंदी घातल्यामुळे अभिनेते कमल हसन कमालीचे कष्टी झाले आहेत. तामिळनाडू सरकारने चित्रपटावर बंदी घातल्यामुळे मी दुखावलो गेलोय. मात्र मी अद्याप शांत आहे. या बंदीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे संकेत दिले असले तरी याबाबत घाई करणार नसल्याचेही कमल हसन यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
स्थानिक न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर पुन्हा मद्रास उच्च न्यायालयाने बंदी कायम ठेवण्याचा निर्णय दिल्यामुळे कमल हसन नाराज झाले आहेत. ‘विश्वरूपम’वर बंदी घातल्यामुळे डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांनी जयललिता यांच्या सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे आणखी व्यथित झालेल्या कमल हसन यांनी चित्रपटावरून सध्या सुरू असलेल्या राजकारणापासून आपल्याला दूर ठेवा, अशी विनंतीही केली आहे. ‘विश्वरूपम’च्या हिंदी चित्रपटाच्या प्रचारासाठी कमल हसन सध्या मुंबईत आहेत. कमल हसन यांचे बंधू चंद्रा हसन यांनी या वादामागे कोणतेही राजकारण नसल्याचा खुलासा केला आहे.

चित्रपटावरील बंदी योग्य- जयललिता
राज्यात ‘विश्वरूपम’ चित्रपटावर बंदी घातल्यानंतर उठलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून राज्य सरकारने सावधगिरीची भूमिका घेऊन चित्रपटावर घातलेली बंदी योग्य आहे. तरी अभिनेते कमल हसन आणि मुस्लीम संघटनांनी चर्चा करून तोडगा काढल्यास सरकार त्याचे स्वागतच करील, असेही मुख्यमंत्री जयललिता यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
चित्रपटावर बंदी घालण्याच्या निर्णयामागे कोणताही वैयक्तिक वाद नाही अथवा वैयक्तिक हित नाही. मात्र चित्रपटातील आक्षेपार्ह चित्रीकरणामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या जाऊन त्यांनी विरोध केला आहे. कमल हसन यांनी प्रदर्शनापूर्वीच मुस्लीम नेत्यांना चित्रपट दाखवला असता तर पुढील अनर्थ टळला असता. मात्र आता कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचेही जयललिता यांनी सांगितले.

विवादास्पद आढळल्यास ‘विश्वरूपम’वर उत्तर प्रदेशातही बंदी- खुशवाह
तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आलेला कमल हसन यांचा ‘विश्वरूपम’ या चित्रपटात मुस्लीम समुदायाच्या भावनांना दुखावले गेल्याचे आढळून आल्यास या चित्रपटावर उत्तर प्रदेशातही बंदी घालण्यात येईल, असे सत्ताधारी समाजवादी पक्षाने गुरुवारी स्पष्ट केले.
‘विश्वरूपम’ चित्रपटातील काही चित्रीकरणाबद्दल मुस्लीम समाजाने आक्षेप घेतल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर उत्तर प्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी संबंधित अधिकारी संपूर्ण चित्रपटाची बारकाईने पाहणी करील. जर चित्रपट मनोरंजनात्मक आणि चांगला असेल तर काही हरकत नाही, अन्यथा काही विवादास्पद आढळल्यास चित्रपटावर बंदी घातली जाईल, असे समाजवादी पक्षाचे महासचिव राम आसरे खुशवाह यांनी स्पष्ट केले.  

 कायदा फेरविचाराची गरज
 आक्षेपार्ह चित्रण असल्याच्या आरोपावरून अभिनेते कमल हसन यांच्या विश्वरूपम चित्रपटावरून सध्या जोरात वाद सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयात सुधारणा करता यावी यासाठी चित्रपट कायद्याच्या समीक्षेची गरज असल्याचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री मनीष तिवारी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.  ट्विटरवरून आपली भूमिका स्पष्ट करताना तिवारी म्हणाले की, विश्वरूपमवरील बंदीबाबतचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. जोपर्यंत न्यायालय त्याबाबत आपला निर्णय देत नाही, तोपर्यंत त्याविषयी भाष्य करणे योग्य नाही. मात्र सध्या सुरू असलेल्या वादावरून असे वाटते की, चित्रपट कायद्यात सुधारणा करण्याबद्दल पुन्हा एकदा त्याची समीक्षा करण्याची गरज आहे, अन्यथा प्रत्येक राज्य स्वतंत्र सेन्सॉर बोर्डासारखे काम करील, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

कमल हसनच्या वक्तव्याने शरद पवार व्यथित
तामिळनाडू सरकारने विश्वरूपम चित्रपटावर बंदी घातल्यानंतर निराश झालेल्या कमल हसन यांनी देश सोडून जाण्याचा विचार बोलून दाखवला. कमल हसन यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री व्यथित झाले आहेत. आपल्या व्यवस्थेत काहीतरी दोष आहे. या देशात आपल्याला विश्वास वाटत नाही अशी भावना लोकांमध्ये निर्माण व्हायला नको. तामिळनाडूत आपण राहू नये असे जर वाटत असेल तर आपण देशाच्या धर्मनिरपेक्ष इतर भागात अथवा परदेशात जाऊन राहू, असे निराशाजनक उद्गार कमल हसन यांनी बुधवारी काढले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, कमल हसन यांनी अशा प्रकारे भावना व्यक्त केल्यामुळे आपण व्यथित झालो आहोत. दरम्यान, विश्वरूपममधील आक्षेपार्ह वाटणारी दृश्ये आपण कापण्यास तयार असलो तरी मद्रास उच्च न्यायालयाने चित्रपटावरील बंदी कायम ठेवली आहे. या चित्रपटासाठी तब्बल १०० कोटी खर्च आला असून, आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाल्यामुळे आपल्याला मोठे नुकसान झाल्याचे कमल हसन यांनी सांगितले.

आज मुंबईत झळकणार
‘विश्वरूपम’चा वाद निवळल्याने ‘विश्वरूप’ची हिंदी आवृत्ती शुक्रवारीच मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित केली जाणार आहे.

६० कोटींचे नुकसान
‘विश्वरूपम’साठी तब्बल ९५ कोटी रुपये खर्च झाला पण प्रदर्शन रखडल्याने ६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कमल हासन यांनी व्यथित मनाने सांगितले.

First Published on February 1, 2013 4:08 am

Web Title: row over vishwaroopam will come to an end