दिल्लीतील रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे तेथील वाहनचालक कमालीचे त्रस्त आहेत. वाहतूक कोंडी झाली तर दहा मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल अर्धा तास किंवा त्याहून अधिक वेळ लागतो. या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत असून, त्यामुळे वर्षाला तब्बल ६० हजार कोटींचा चुराडा होत आहे. इतकेच नव्हे, तर वाहतूक कोंडीतून मार्ग न काढल्यास २०३० पर्यंत हे नुकसान ९८ हजार कोटींपर्यंत पोहोचेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयआयटी मद्रासद्वारा केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. या अभ्यासात वाहतूक कोंडीमुळे इंधन, वायू प्रदूषण आणि रस्ते अपघात यामुळे मोठे नुकसान सोसावे लागत असल्याचे समोर आले आहे.

दिल्लीतील रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वर्षाला ६० हजार रुपये नुकसान सोसावे लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आपल्या निश्चित ठिकाणी वेळेत पोहोचत नाहीत. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होते. गेल्या वर्षभरात रस्ते आणि उड्डाणपुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, अद्यापही वाहतूक कोंडीतून मार्ग निघालेला नाही. गुडगाव, फरीदाबाद, नोएडा आणि गाझियाबाद या मार्गांना जोडणारे उड्डाणपूल आणि रस्त्यांवर सर्वाधिक वाहतूक कोंडी होते, असे अभ्यासातून समोर आले आहे. या या ठिकाणी सर्वाधिक लोक नोकरीसाठी ये-जा करत असतात. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस दिल्लीच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्यानुसार या वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला नाही तर, २०३० पर्यंत वाहतूक कोंडीमुळे होणारे नुकसान ९८ हजार कोटींपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.