सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वावरून मोठं वक्तव्य केलं आहे. धर्म आणि संस्कृतीची पर्वा न करता ज्यांच्या मनात राष्ट्रवादाची भावना आहे आणि भारताच्या संस्कृतीप्रती आदर आहे ते हिंदू आहेत आणि देशातील १३० कोटी लोकांना संघ हिंदूच मानतो, असं मोहन भागवत म्हणाले. संपूर्ण समाज हा आपलाच आहे आणि एकात्मिक समाजाची निर्मिती करणं हे संघाचं उद्दिष्ट्य असल्याचं भागवत म्हणाले.

जी व्यक्ती भारताला आपली मातृभूमी मानते, देशातील जन, जल, जमीन, प्राणी यांसह संपूर्ण भारतावर प्रेम करते, भारताची भक्ती करते, भारताच्या संस्कृतीला आपल्या जीवनात स्थान देतो, अशी कोणतीही व्यक्ती जी कोणतीही भाषा बोलत असेल, ती कोणत्याही प्रांतातील असेल, पूजा अर्चना करत असेल किंवा करत नसेल तो भारतमातेचा सुपुत्र हिंदू आहे. त्यामुळे भारतातील १३० कोटी लोक हे हिंदूच आहेत. हा संपूर्ण समाज आपला आहे आणि असा एकात्मिक समाज निर्माण करण्याचे संघाचे ध्येय आहे, असं भागवत म्हणाले.

सर्वांच्या प्रगतीसाठी आपण एकत्र यायला हवं. या विचारालाच जग हिंदू विचार मानते. हाच भारताचा परंपरागत विचार आहे. लोकं म्हणतात आम्ही हिंदूत्ववादी आहोत. परंतु आम्ही परंपरेने हिंदुत्ववादी आहोत, असंही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सर्वांचा विचार करतो आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे, असंही ते यावेळी म्हणाले. विविधतेत एकता हे प्रचलित वाक्य आहे. परंतु आपला देश एक पाऊल पुढे आहे. आम्ही विविधतेत एकता नाही तर विविधता ज्या एकतेतून आली आहे त्याचा शोध आम्ही घेत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं.