एमआयएमचे नेते अकबरउद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संभावना ‘ब्रह्मचारी व्यक्तींचे टोळके’ अशा शब्दात करत नवा वाद ओढवून घेतला आहे. ज्या व्यक्ती विवाहित नाहीत ते अधिकाधिक मुले व्हावीत म्हणून आवाहन करत आहेत. त्यांना याचा अधिकार काय? असा सवाल त्यांनी केला आहे.
तेलंगण विधानसभेत एमआयएमचे गटनेते असलेल्या ओवेसींनी साक्षी महाराजांचा नामोल्लेख टाळत हिंदूना चार अपत्ये व्हावी, असे आवाहन करणाऱ्यांना ती पोसणार कशी हे माहीत आहे काय? याचा खुलासा करावा अशी सूचना केली. त्यांच्या शिक्षण व नोकऱ्यांचे काय? संघाचे प्रचारक अविवाहित असतात. ते कौटुंबिक जबाबदाऱ्या घेत नाहीत. त्यांना आयुष्यात कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. तेच आता चार मुले व्हावी असा सल्ला कसा देतात, असा सवाल ओवेसी यांनी विचारला आहे. मजलीस मुख्यालयातील कार्यक्रमात ओवेसी बोलत होते.
देश सध्या कठीण काळातून जात आहे. सर्व मुस्लिमांनी एकजूट ठेवावी. जर ही एकजूट राखली नाही, तर मुस्लिमांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल असा इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान भेटीत तेथील पंतप्रधानांना भगवद् गीतेची प्रत देण्याबाबतही ओवेसींनी हरकत घेतली. मोदी जर धर्मनिरपेक्ष असतील तर त्यांनी भारतीय घटनेचे पुस्तक जपानच्या पंतप्रधानांना द्यायला हवे होते, अशी अपेक्षा ओवेसी यांनी व्यक्त केली.