काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. देश असो किंवा विदेश आरएसएसवर ते नेहमी शरसंधान साधत असतात. दरम्यान, आरएसएस आता त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राहुल गांधींना निमंत्रण देणार असल्याचे बोलले जात आहे. हा कार्यक्रम दिल्लीत १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. संघ प्रचारप्रमुख अरूणकुमार यांनी या कार्यक्रमाचे सर्व पक्षांना निमंत्रण पाठवणार असल्याचे सांगितले आहे. राहूल गांधींना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिल्याची बातमी सूत्रांच्या हवाल्यानं टाइम्स नाऊनं दिली आहे. दरम्यान, राहुल गांधी हे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांच्या पावलावर पाऊल ठेवणार का हे पाहणे आता उत्सुकतेचे आहे. दरम्यान, जे भारत समजू शकले नाहीत, ते संघाला कसे समजून घेतील असा टोला अरूणकुमार यांनी राहुल गांधी यांना यावेळी लगावला. राहुल गांधींनी संघाची तुलना मुस्लीम ब्रदरहूड या अरब देशातील संघटनेशी केली होती.

याचवर्षी जून महिन्यात प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात गेले होते. त्यांनी ‘तृतीय वर्ष वर्ग’च्या कार्यक्रमात संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले होते. त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यामुळे काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

अरूणकुमार म्हणाले की, १७ ते १९ सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या संमेलनासाठी सर्व राजकीय पक्षांना आमंत्रित करण्यात येणार आहे. ‘फ्यूचर ऑफ इंडिया’ असे कार्यक्रमाचे नाव आहे. नुकताच लंडनमध्ये राहुल गांधी यांनी आरएसएसची तुलना सुन्नी इस्लामी संघटना मुस्लीम ब्रदरहूडशी केली होती. याबाबत बोलताना अरूणकुमार म्हणाले की, जे भारताला समजू शकले नाहीत, ते संघाला कसे समजून घेतील, असा टोला त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता लगावला.

संघाला भारताचे मूळ स्वरूप बदलायचे आहे: राहुल गांधी

आम्ही एका संघटनेशी संघर्ष करत आहोत. त्याचे नाव आरएसएस आहे.. ज्यांना भारताचे मूळ स्वरूप बदलायचे आहे. देशातील संस्थांवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेली भारतात अशी दुसरी कुठलीच संघटना नाही. आम्ही ज्यांच्याशी झुंज देत आहोत ते एक नवा विचार आहे. असा विचार जो अरब जगतात मुस्लीम ब्रदरहुडच्या रूपात पाहिला जातो, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आरएसएसवर टीका केली होती.