विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना भाजप सरकार आणि नरेंद्र मोदींवर टीका करणे चांगलेच महागात पडणार आहे असे दिसते आहे. कारण प्रवीण तोगडिया यांना त्यांच्या पदावरून  हकालपट्टी करण्याचा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रवीण तोगडियांसह भारतीय मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी विरजेश उपाध्याय आणि विहिंपचे अध्यक्ष राघव रेड्डी यांचीही पदावरून हकालपट्टी करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. प्रवीण तोगडिया, विरजेश उपाध्याय आणि राघव रेड्डी हे त्यांचाच अजेंडा चालवत आहेत ज्यामुळे सरकारला मान खाली घालावी लागते आहे, या गोष्टीमुळे संघ या तिघांवरही नाराज आहे आणि त्यांची त्यांच्या पदांवरून हकालपट्टी करण्याच्या विचारात आहे असे समजते आहे.

विहिंप असेल किंवा भारतीय मजदूर संघ या दोन्ही संघटनांचा संघ विचारांच्या प्रसारासाठी उपयोग होत नाहीये. एका अहवालानुसार विश्व हिंदू परिषदेची बैठक फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. या बैठकीत राघव रेड्डी यांना हटवून नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. फक्त रेड्डीच नाही तर प्रवीण तोगडिया आणि त्यांच्या इतर समर्थकांनाही पदावरून हटवण्याचा विचार संघाकडून सुरु आहे. या तिघांची आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संघातूनही हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या संघटनांनी सरकारसोबत कोणतेही मतभेद करू नयेत असे संघाचे मत आहे.

मंगळवारीच प्रवीण तोगडिया यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या एन्काऊंटचा कट रचला गेला असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. तसेच आपल्याविरोधात षडयंत्र रचले जाते आहे, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे तरीही मी हिंदू एकतेसाठी लढत राहणार असे म्हटले होते. तसेच मी कोणालाही घाबरत नाही पण मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ज्या केसेस ठाऊकही नाहीत त्यात गोवण्याचा प्रयत्न केला जातो आहे असे आरोप तोगडिया यांनी केले. तोगडिया यांचा रोख सरळसरळ मोदींकडेच होता.  त्यामुळे त्यांचे हे आरोप आता त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे. कारण या आरोपांमुळेच तोगडिया यांची हकालपट्टी करण्याचा विचार संघाकडून होतो आहे असे समजते आहे.