केंद्र सरकराने कलम 370 आणि 35 अ हटवण्याचा जो निर्णय घेतला तो अत्यंत धाडसी निर्णय असून त्याचं आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिली. कलम 370 आणि 35 अ हे यापूर्वीच रद्द झाले पाहिजे होते. परंतु आता उशीर झाला असला तरी हा निर्णय धाडसी असल्याचे ते म्हणाले. गुरूवारी ध्वजारोहणानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

जगभरात आज भारताला एक सन्मानाचं स्थान आहे. ते अधिक मोठं व्हावं, असा विश्वास भय्याजी जोशी यांनी ध्वजारोहणानंतर व्यक्त केला. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेवही आपली प्रतिक्रिया दिली. पाकिस्तान हा रा.स्व. संघाला लक्ष्य करत नसून पाकिस्तान भारताला लक्ष्य करत असल्याचे ते म्हणाले.

इम्रान खान यांनी दिलेल्या कोणत्याही इशाऱ्याची चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या देशाची चिंता करावी, असे ते यावेळी म्हणाले. तसेच त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकावणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर उत्तर देताना याचा निर्णय केंद्र सरकारने करायला हवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.