मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्याच्या कुमेड गावात 23 जानेवारीला झालेल्या कथित आरएसएस कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. आरएसएस कार्यकर्त्यानेच विम्याची 20 लाखांची रक्कम मिळवण्यासाठी आपल्या मृत्यूचा बनाव केल्याचा संशय आहे. यासाठी त्याने आपल्याच कर्मचाऱ्याची हत्या केली आणि आपला मृत्यू झाला आहे हे दाखवण्यासाठी मृतदेहाला आपले कपडे घातले आणि सामान आजुबाजूला पसरवून ठेवलं. आरोपीने मृतदेहाचे कपडे बदलले असले तरी त्याची अंतर्वस्त्रे बदलली नाही. यामुळेच त्याच्या पत्नीने मृतदेहाची ओळख पटवली. आरएसएस कार्यकर्त्याच्या हत्येनंतर राज्यात राजकीय वाद निर्माण झाला होता. भाजपाने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यभरात निदर्शनं केली होती.

पोलीस अधिक्षक गौरव तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जानेवारीला आरएसएस कार्यकर्ता हिम्मत पाटीदार याची चेहरा जाळून हत्या करण्यात आल्याची माहिती त्याच्या वडिलांनीच पोलिसांना दिली होती. नातेवाईकांना कपडे आणि इतर गोष्टींच्या आधारे हा मृतदेह हिम्मतचा असल्याचा दावा केला होता. पण जसजसा तपास पुढे जाऊ लागला पोलिसांना हिम्मच्या शेतात काम करणारा कर्मचारी मदनलाल मालवीय बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांना सुरुवातीला मदनलाल हिम्मतची हत्या करुन फरार झाला असल्याचा संशय होता. पण जेव्हा हिम्मतच्या डायरीमधून वीमा क्रमांकसह इतर माहिती मिळाली आणि फोनमधून सगळा डाटा डिलीट केल्याचं लक्षात आलं तेव्हा पोलिसांना वेगळाच संशय येऊ लागला. आपला संशय दूर करण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाची डीएनए चाचणी केली तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला. डीएनए चाचणीत मृतदेह हिम्मतचा नसून त्याच्या शेतात काम करणाऱ्या मदनलालचा असल्याचं समोर आलं.

पोलिसांनी सांगितलं की, हिम्मतने हत्या केल्यानंतर मदनलालच्या अंगावरील सर्व कपडे बदलले पण अंतर्वस्त्र बदललं नाही. ज्यावरुन मदनलालच्या पत्नीने मृतदेहाची ओळख पटवली. 20 लाखांची विम्याची रक्कम मिळवण्यासाठीच हिम्मतने हा कट रचला असल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्येनंतर हिम्मत फरार असून पोलिसांनी त्याच्यावर 10 हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे.