दक्षिण चीन समुद्रातील स्वामित्वाबाबतचे वाद संबंधित देशांनी परस्पर चर्चेद्वारे सोडवावेत आणि या प्रकरणी बाहेरील देशांनी ढवळाढवळ करू नये, असे म्हणत रशियाने चीनच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी भेटीची पूर्वतयारी म्हणून तसेच आशियातील देशांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेसाठी रशियाचे सर्गेई लावरोव्ह चीन दौऱ्यावर गेले आहेत. शुक्रवारी त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांची भेट घेऊन दक्षिण चीन समुद्रातील वादाबाबत चर्चा केली. या वेळी हा वाद संबंधित देशांनी परस्पर चर्चेने आधारावर सोडवावा अशी भूमिका रशियाने घेतली.