News Flash

Ryan School Murder: परीक्षा टाळण्यासाठी ११ वीच्या विद्यार्थ्याने केली प्रद्युम्नची हत्या

यापूर्वी पोलिसांनी शाळेच्या बस कंडक्टरने प्रद्युम्नची हत्या केल्याचा दावा केला होता.

Ryan School Murder: हरयाणातील रायन इंटरनॅशनल शाळेत दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणाला बुधवारी नवे वळण मिळाले. अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षा आणि पालक सभा रद्द व्हावी यासाठी प्रद्युम्नची हत्या केल्याचे सीबीआयच्या तपासातून उघड झाले आहे. प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार झाला नव्हता, असेही सीबीआयने स्पष्ट केले.

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूरची (वय ७ वर्ष) सप्टेंबरमध्ये शाळेच्या आवारातच हत्या करण्यात आली होती. शाळेच्या शौचालयात प्रद्युम्नचा गळा चिरलेला मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न याप्रकरणानंतर चर्चेत आला होता. गुरुग्राम पोलिसांनी याप्रकरणात शाळेतील बस कंडक्टर अशोक कुमारला अटक केली होती. विशेष म्हणजे अशोक कुमारने गुन्हा कबूल केल्याचा दावाही पोलिसांनी केला होता. मात्र, प्रद्युम्नच्या कुटुंबियांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. वाढत्या दबावानंतर हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले.

सीबीआयच्या तपासात प्रद्युम्न हत्याप्रकरणाला नवे वळण मिळाले. सीबीआयने रायन इंटरनॅशनलमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची चौकशी केली. पाच वेळा त्या विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आली. शाळा आणि सीबीआयच्या कार्यालयात त्याची चौकशी करण्यात आली होती. चौकशी दरम्यान त्या मुलाने प्रद्युम्नच्या हत्येची कबुली दिल्याचे सीबीआयने म्हटले आहे. शाळेतील परीक्षा आणि पालक सभा रद्द व्हावी यासाठी प्रद्युम्नची हत्या केल्याचे त्याने सांगितले. सीबीआयच्या पथकाने त्या मुलाला अटक केली असून त्याला दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

आरोपी हा १६ वर्षांचा असून सीबीआयच्या या कारवाईवर आरोपी मुलाच्या वडिलांनी प्रश्न उपस्थित केले आहे. प्रद्युम्नच्या कुटुंबियांच्या भावना मी समजू शकतो. पण माझ्या मुलाला या गुन्ह्यात नाहक अडकवले जात आहे, त्याचा या प्रकरणाशी संबंध नाही, असे त्या मुलाच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. सध्या सीबीआयने या घटनाप्रकरणात प्रतिक्रिया दिलेली नाही. दुपारनंतर सीबीआय पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. गुन्हा घडला त्यावेळी आरोपी शौचालयातून बाहेर येतानाचे सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयच्या हाती लागले आहे.

गुरुग्राम पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
शाळेचा बस कंडक्टर अशोक कुमारने गुन्ह्याची कबूली दिली असे गुरुग्राम पोलिसांनी सांगितले होते. अशोकने प्रद्युम्नवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला,मात्र प्रद्युम्नने विरोध दर्शवल्याने त्याची हत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे होते.  पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असे सांगितले होते. मग जे फुटेज सीबीआयच्या हाती लागले ते पोलिसांच्या नजरेतून कसे सुटले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 12:26 pm

Web Title: ryan school murder case cbi arrest class xi student killed pradyuman thakur to postpone examination parents meeting
टॅग : Cbi
Next Stories
1 Demonetisation : नोटाबंदीमुळे १५ लाख लोकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड
2 Demonetisation: नोटाबंदीनंतर ०.०००११ % लोकांनी तब्बल ३३% रक्कम जमा केली : केंद्र सरकार
3 अश्रूचा एक थेंबही सत्ताधाऱ्यांसाठी धोकादायक : राहुल गांधीचा सरकारवर निशाणा
Just Now!
X