हरयाणातील प्रद्युम्न ठाकूर हत्याप्रकरणी अखेर सीबीआयने तपास सुरु केला आहे. सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे वृत्त असून गुरुग्राम पोलिसांकडून सीबीआयने या प्रकरणातील सर्व दस्तावेज ताब्यात घेतले आहे.

रोहतकमधील ‘रायन इंटरनॅशनल’ शाळेत दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर या ७ वर्षाच्या मुलाची शाळेच्या आवारातच हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी शाळेतील बस कंडक्टर अशोक कुमारला अटकही केली होती. मात्र या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी प्रद्युमनच्या आई-वडिलांनी आणि शाळेबाहेर आंदोलन करणाऱ्या संतप्त पालकांनी केली होती. यानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

शुक्रवारी सीबीआयने याप्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. सीबीआयने गुन्हा दाखल केला असून सीबीआयची फॉरेन्सिक टीम शाळेत जाऊन पुरावे गोळा करणार असल्याचे समजते. तसेच प्रद्युम्नच्या आईवडिलांचा जबाबही घेतला जाईल असे सूत्रांनी सांगितले. आरोपी अशोक कुमारलाही सीबीआय ताब्यात घेणार असून त्याचीदेखील चौकशी होणार आहे. सीबीआयचा भर फॉरेन्सिक तपासावर असेल असे सूत्रांनी सांगितले.

प्रद्युम्नचा लैंगिक छळ करुन हत्या करण्यात आली असा दावा सुरुवातीला केला जात होता. मात्र, प्रद्युम्नच्या गळ्यावर दोन वार करण्यात आले. मात्र त्याच्यावर लैंगिक छळ केल्याचा पुरावा सापडला नाही असे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे प्रद्युम्नची हत्या नेमकी का झाली असा प्रश्न उपस्थित झाला होता.