दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये मोठा फटका बसला असून पक्षाचे उत्तर प्रदेशमधले महत्त्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका करत ते भाजपामध्ये दाखल झाले. मात्र, त्यापाठोपाठ सचिन पायलट देखील भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी देखील पत्रकार परिषदांमधून आपली नाराजी बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चामुळे काँग्रेस नेते सचिन पायलट चांगलेच संतापले आहेत. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारताच पायलट यांनी “त्यांच्यात मला भेटण्याची हिंमत नाहीये”, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन पायलट हे राहुल गांधींच्या कंपूमधला तरुण चेहरा म्हणून पक्षात ओळखले जातात. मात्र, एकीकडे त्यांच्या नाराजीच्या चर्चा आणि दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंदियांपाठोपाठ जितिन प्रसाद यांनी देखील भाजपाचा रस्ता धरल्यामुळे ते देखील भाजपामध्ये जाणार असल्याचं वातावरण निर्माण झालं. भाजपाच्या काही नेत्यांकडून देखील तशा प्रकारची विधानं केली गेली. यामध्ये भाजपा नेत्या रिटा बहुगुणा यांनी देखील नुकतंच त्यासंदर्भात विधान केल्यानंतर सचिन पायलट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

“त्या सचिन तेंडुलकरसोबत बोलल्या असतील!”

“रिटा बहुगुणा जोशी म्हणाल्या आहेत की त्यांचं सचिनशी बोलणं झालं आहे. त्यांचं कदाचित सचिन तेंडुलकरसोबत बोलणं झालं असेल. माझ्याशी बोलण्याची त्यांच्यात हिंमत नाहीये”, असं सचिन पायलय म्हणाले आहेत.

अमित शाह यांच्यासोबत जितिन प्रसाद यांच्या ‘त्या’ फोटोवर सत्यजित तांबेंचं खोचक ट्वीट; म्हणाले…!

“काँग्रेसमध्ये त्यांना चुकीची वागणूक”

रिटा बहुगुणा यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन पायलट भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. “जितिन प्रसाद यांच्याप्रमाणेच सचिन देखील लवकरच भाजपामध्ये दाखल होणार आहे. काँग्रेस पक्षामध्ये त्यांना चुकीची वागणूक मिळते आहे”, असं रिटा बहुगुणा म्हणाल्या होत्या. त्यावरच सचिन पायलट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“तुम्ही ऐकलं नाहीत, तर वाईट परिस्थिती ओढवेल”, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला इशारा!

सचिन पायलट का नाराज?

सचिन पायलट हे राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत झालेल्या वादामुळे त्यांनी पक्षनेतृत्वाकडे तक्रार केली होती. त्यानंतर पायलट यांनी पदांचा राजीनामा देखील दिला होता. हा वाद सोडवण्यासाठी काँग्रेसकडून के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल आणि अजय माकन यांची एख समिती देखील नियुक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांनी हा वाद शमला. पण काही दिवसांपूर्वीच सचिन पायलट यांनी काँग्रेस हाय कमांडनं दिलेलं आश्वासन न पाळल्याची तक्रार बोलून दाखवली होती. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाबाबत जोरात चर्चा सुरू झाली आहे.