राजस्थानमधील सत्ता राखण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी मनधरणीही केली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी दोघेही सचिन पायलट यांच्याशी चर्चा करीत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, काँग्रेसकडून हे वृत्त फेटाळण्यात आलं आहे. सचिन पायलट हे गांधी कुटुंबीयांच्या संपर्कात नाही, ते भाजपासोबत चर्चा करत आहे, असं वृत्त काँग्रेस सूत्रांच्या हवाल्यानं एनडीटीव्ही इंडियानं दिलं आहे.
आमदारांच्या घोडाबाजार प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावल्यानंतर उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची नाराजी समोर आली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील मतभेदही पहिल्यांदाच इतके विकोपाला गेल्याचं दिसले. त्यानंतर सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वाची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली, तर दुसरीकडे राजस्थानात आमदार जुळवाजुळवी सुरू झाली. आज अशोक गेहलोत यांच्या समर्थनाचा ठरावही मंजूर करण्यात आला. दरम्यान, सचिन पायलट काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या संपर्कात असल्याचं वृत्त होतं. मात्र, ते काँग्रेसनं फेटाळून लावलं आहे.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं की, “सचिन पायलट गांधी कुटुंबातील कुणाच्याही थेट संपर्कात नाही. संपर्कात असल्याची चर्चा फक्त माध्यमांमध्येच सुरू आहे. पायलट हे अजून भाजपाच्या संपर्कात आहे, असंच काँग्रेसला वाटत आहे. त्यांच्याकडून नकार येत असतानाही त्यांच्या चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी काँग्रेस तयार आहे,” असंही या नेत्यानं म्हटलं आहे.
राजस्थानमधील राजकीय गुंता सोडवण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधींनीही पुढाकार घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी सचिन पायलट यांच्यासोबत चर्चा केल्याचं म्हटलं जात असतानाच सचिन पायलट यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. राहुल गांधी यांच्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 13, 2020 7:18 pm