नवी दिल्लीतल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी गुरुवारी रात्री रोहिणी भागातील एका आश्रमातून ४० मुलींची सुटका केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार हा आश्रम स्वयंघोषित संत विरेंद्र देव दीक्षितचा आहे. खेदाची बाब म्हणजे या बाबाला १६,००० महिलांनी त्याच्यासोबत रहावं अशा भावनेनं पछाडलेलं आहे.

भगवान श्रीकृष्णांनी १६ सहस्त्र नारींना पत्नीचा दर्जा दिला होता या आख्यायिकेला प्रमाण मानत स्वत:ला ईश्वरी अवतार भासवणाऱ्या या बाबालाही १६ हजार महिलांची संगत हवी आहे. सर्वाती आधी मेल टुडेनं रोहिणीतल्या अध्यात्मिक विश्व विद्यालय आश्रमासंदर्भात याच आठवड्यात वृत्तांकन केलं होतं. त्यानंतर या आश्रमामध्ये नक्की काय चालतं याचा छडा लावण्याचा प्रयत्न सरकारी अधिकाऱ्यांनी केला. आत्तापर्यंत ४० मुलींची अधिकाऱ्यांनी सुटका केल्याची माहिती आहे. या मुलींना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्यात आलं होतं असं सांगत दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी बाबा विरेंद्र देव दीक्षितला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

त्याआधी अनेक अल्पवयीन मुलींचा सदर बाबा लैंगिक छळ करत असल्याच्या तक्रारी काही पालकांनी केल्या होत्या, ज्याची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने या आश्रमाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.
या मुलींना अत्यंत वाईट स्थितीत आश्रमात कोंडून ठेवले असल्याचेही आढळले आहे. या मुलींना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नव्हती, मित्र मैत्रिणींना भेटायची परवानगी नव्हती एवढंच नव्हे तर त्यांना अंधाऱ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते.

पालकांकडून स्टँप पेपरवर स्वेच्छेने आश्रमात पाठवत आहोत असे लिहून घेण्यात आल्याचे मेल टुडेच्या तपासात आढळले होते. एकदा का आश्रमात दाखल झाल्या की या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात यायचे असा आरोप करण्यात आला आहे. मुलींनी १८ वय पार केले, त्या सज्ञान झाल्या की त्यांच्याकडूनही स्टँपपेपरवर स्वेच्छेने त्या राहत असल्याचे तो लिहून घेत असे. मुलींना सांभाळण्यासाठी बाबा पालकांकडून देणग्याही घेत असल्याचा आरोप आहे.

अन्य बाबांप्रमाणेच हा बाबाही अनेक बेकायदेशीर कृत्ये करत असल्याचा आरोप असून लवकरच खरं काय ते उजेडात येणार आहे.