वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकिर नाईककडून भारताच्या न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावरुन माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.


भारतातील न्याय प्रक्रिया सदोष असल्याचे सांगत त्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या नाईकला उत्तर देताना खुर्शीद म्हणाले, आपल्याकडे न्यायव्यवस्थेत थोडा विलंब होऊ शकतो मात्र, न्याय जरुर मिळतो. जो कोणी न्यायव्यवस्थेच्या फेऱ्यात येतो किंवा कोणावरही आरोप झाले तर त्याच्यामध्ये न्याय प्रक्रिया झेलण्याचे धाडस असायला हवे.

इस्लामिक धर्मगुरु असलेल्या नाईकने काही दिवसांपूर्वी भारतात परतण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले होते की, जोपर्यंत भारतातील न्याय प्रक्रिया ठीक होत नाही तोपर्यंत मी भारतात येणार नाही. यावरुन देशात चर्चांना सुरुवात झाली होती. नाईकचा हा उद्दामपणा असल्याचेही काहींचे म्हणणे होते.

झाकिर नाईक हा एक वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक आहे. त्याच्यावर कट्टरपंथी विचारधारा पसरवण्याचा आरोप आहे. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचा तो संस्थापक आहे. पीस टीव्ही नावाचा एक चॅनेलही तो चालवत होता. हा चॅनेलही अनेक कारणांनी वादात सापडला होता. झाकिर नाईक ऊर्दू किंवा अरबी भाषेत व्याख्यान न देता इंग्रजीत व्याख्यान देतो. तसेच परंपरागत कपडे न घालता तो सूट आणि टाय वापरतो.