आरोग्य सेतू उपयोजनातून लोकांची माहिती घेऊनही सरकार कोविड १९ ला रोखण्यात अपयशी ठरले असून रुग्ण संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली आहे.

ते म्हणाले की, करोना रुग्णात भारताने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलला मागे टाकले असून भाजप सरकारचे सगळे दावे उघडे पडले आहेत. सरकारने आरोग्य सेतू उपयोजनातून लोकांची माहिती घेतली तरी त्यांना करोनाची रुग्ण संख्या रोखता आली नाही.

भाजपचे टाळ्या, थाळ्या व दिवे पेटवण्याचे लोकांसमोर केलेले नाटक कुचकामी ठरले आहे. भारताची कोविड १९ रुग्ण संख्या आता ४२ लाखांवर गेली असून काल एकाच दिवसात ९०८०२ रुग्ण सापडले होते. आतापर्यंत ३२,५०,४२९ रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी रुग्ण बरे होण्याचा दर हा ७७.३० टक्केहोता. आता भारतात करोना रुग्णांची संख्या ४२,०४,६१३ असून मृतांचा आकडा ७१६४२ झाला आहे. गेल्या २४ तासात १०१६ मृत्यू झाले आहेत.