मागील ४ वर्षांपूर्वी फोनचे उत्पादन करणाऱ्या २ फॅक्टरी होत्या. आज ती संख्या १२० वर पोहोचली आहे. यापैकी ५० हून अधिक नोएडा येथे आहेत. यामुळे ४ लाखांहून अधिक युवकांना थेट रोजगार मिळाला असून यामध्ये सॅमसंग कंपनी अग्रेसर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने नोएडा येथे जगातील सर्वांत मोठी मोबाइल फॅक्टरी सुरू केली आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, सॅमसंगमुळे संपूर्ण देशात ७० हजार लोकांना थेट रोजगार मिळाला आहे. यापैकी ५ हजार रोजगार हे नोएडा आहेत. या नव्या प्लांटमुळे आणखी १ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. या प्लांटमधून दर महिन्याला सुमारे एक कोटी फोन तयार होतील. यातील ३० टक्के फोनची निर्यात होणार असल्याचे मोदींनी सांगितले.

भारत आज मॅन्युफॅक्चरिंग हब होण्याच्या दिशेने पुढे जात आहे. दक्षिण कोरियाचे तंत्रज्ञान आणि भारताच्या उत्पादन क्षमतेमुळे जगाला एक मजबूत उत्पादन मिळेल. सॅमसंगने नोएडामध्ये केलेल्या ५ हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे दक्षिण कोरिया आणि भारताचे संबंध आणखी मजबूत होतील, अशी विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डिजिटल तंत्रज्ञान सामान्य व्यक्तीचे जीवन सुलभ करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. आज ३२ कोटी लोक देशातील ब्रॉडबँड सेवेचा वापर करत आहेत. देशात होत असलेल्या डिजिटल क्रांतीचे हे संकेत आहेत. वेगवान इंटरनेटमुळे वस्तूंची डिलेव्हरी लवकर होणे सुनिश्चित झाले आहे. आज जवळपास प्रत्येक सेवा ही ऑनलाइन मिळत आहे. भीम अॅप आणि रूपे कार्डच्या व्यवहारात सुलभता आली आहे. जगभरातही या अॅपबद्दल उत्सुकता आहे. भारतीय लोकांच्या जीवनात सॅमसंगने विशेष स्थान मिळवले आहे. सॅमसंगच्या या युनिटमुळे भारताच्या विकासात आणि मेक इन इंडियाच्या मोहिमेला बळ मिळाले आहे.