जीएसटी परिषदेची २८ वी बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत सॅनिटरी नॅपकिन जीएसटीच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला. महाराष्ट्र सरकारने सॅनिटरी नॅपकिनवर लावण्यात आलेला जीएसटी मागे घ्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर परिषदेने हा निर्णय घेतला आहे. सॅनिटरी नॅपकिनवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. आता जीएसटी कक्षेबाहेर सॅनिटरी नॅपकिन गेल्याने याच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे अर्थमंत्री मनिष सिसोदिया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला या संदर्भातली माहिती दिली.

जीएसटी कौन्सिलची २८ वी बैठक आज पार पडली, २८ टक्क्यांच्या स्लॅबमधून अनेक वस्तू वगळण्याचा निर्णय घेतला गेला. बांबू फ्लोअरिंगवरचा जीएसटी कमी करण्यात आला आहे. हा जीएसटी आता १२ टक्के असणार आहे. इथेनॉलवरचा जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. सरल रिटर्न दाखल करण्याच्या प्रक्रियेला जीएसटी कौन्सिलने मंजुरी दिली. तसेच ५ कोटी रूपये किंवा त्याहून अधिक रकमेचा टॅक्स भरणाऱ्यांना दर महिन्याला रिटर्न फाईल करणे बंधनकारक असणार आहे.