पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातून चिनी सैन्याने अखेर माघार घेतली असून तेथील सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. या फोटोंमधून चिनी सैन्य मागे हटल्याचं दिसत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या रविवारी दूरध्वनीवरुन चर्चा झाली. जवळपास दोन तास चाललेल्या या चर्चेनंतर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. भारत आणि चिनी सैनिक सध्या तीन ठिकाणाहून आपलं सैन्य मागे घेत आहेत. यामध्ये हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि गलवान खोऱ्याचा समावेश आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, चीनने माघार घेतली असून अखेर त्यांच्या सीमारेषेवर पोहोचलं आहे.

गलवान खोऱ्यातील काही सॅटेलाइट फोटो समोर आले असून यामध्ये तिथे झालेले बदल स्पष्ट दिसत आहेत.

या फोटोत चीनने परिसरात केलेलं बांधकाम दिसत आहे (Photo Courtesy: Maxar)

 

याआधी २८ जून रोजी जे फोटो समोर आले होते त्यामध्ये सीमारेषेवर दोन्ही बाजूला चीनने बांधकाम केल्याचं दिसत होतं. पण नव्याने आलेल्या फोटोंमध्ये चीनने हे बांधकाम हटवल्याचं दिसत आहे.

नव्याने आलेल्या फोटोमध्ये चीनने हे बांधकाम हटवल्याचं दिसत आहे (Photo Courtesy: Maxar)

हे ठिकाण पॅट्रोल पॉईंट १४ येथील आहे. याच ठिकाणी १५ जून रोजी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते तर चीनचेही जवळपास ४५ जवान ठार झाले असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये एका अधिकाऱ्याचाही समावेश होता. रविवारी झालेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांचं मतभेदाचं रुपांतर वादात होऊ होऊ नये यावर एकमत झालं आहे. तसंच सीमारेषेवर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर केली जावी यावरही दोन्ही देशांनी संमती दर्शवली आहे.