मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या पदरी निराशा पडू शकते असा अंदाज सर्वेक्षण चाचणीतून वर्तवण्यात आलेला असताना सट्टा बाजाराने बिलकुल याउलट कौल दिला आहे. उमेदवार ठरवताना सर्वच पक्षांची कसोटी लागलेली असताना दुसऱ्या बाजूला सट्टे बाजारात मात्र या निवडणुकीबद्दल प्रचंड उत्साह आहे. सट्टेबाजाराचा कौल भाजपाच्या बाजूने आहे. मध्य प्रदेशात भाजपा चौथ्यांदा सत्ता मिळवेल असा बुकींचा अंदाज आहे.

बुकींच्या अंदाजानुसार एखाद्या व्यक्तीने भाजपावर १० हजार रुपये लावले तर त्याला ११ हजार रुपये मिळू शकतात. तेच काँग्रेसच्या बाबतीत ४,४०० रुपये लावले तर पैसे बुडण्याची शक्यता आहे. काँग्रेसने विजय मिळवला तर पैसे लावणाऱ्यांना जास्त फायदा आहे पण लोक भाजपावरच सट्टा लावतील असा बुकींचा अंदाज आहे. मध्य प्रदेशात भाजपाच चौथ्यांदा सत्ता मिळवेल तिथे काँग्रेस जिंकण्याची शक्यता धूसर आहे असे एका बुकीने आत्मविश्वासाने सांगितले.

भाजपा छत्तीसगडमध्येही विजय मिळवेल. राजस्थानमध्ये काँग्रेस पुनरागमन करेल असे बुकीने सांगितले. उमेदवार निश्चित झाल्यानंतर दर बदलत जातील. पण हाच कल कायम राहिल असा अंदाज असल्याचे एक बुकी म्हणाला. प्रत्येक निवडणुकीत कोटयावधी रुपयाचा सट्टा लावला जातो. फक्त फोनवरुनच नाही तर वेबासाइट आणि अॅप द्वारे सट्टा खेळला जातो. एबीपी न्यूज आणि सी वोटर्सने केलेल्या सर्वेक्षणात दावा करण्यात आला आहे की, जर आजच्या तारखेला विधानसभा निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाचा पराभव होईल. तसंच छत्तीसगडमध्येही हाती निराशा लागण्याची शक्यता आहे.