येमेनमध्ये लागोपाठ सहाव्या रात्रीही सौदी अरेबियाचे हल्ले सुरूच होते. हुथी जातीच्या शिया बंडखोरांची आगेकूच रोखण्यासाठी हे हल्ले गेल्या आठवडय़ात सुरू केल्यानंतर आता इराणने येमेनला हवाई मार्गाने मदत पाठवली आहे. दरम्यान सौदी अरेबियाने पाकिस्तानला सैन्य पाठवण्याची जी विनंती केली होती त्यावर पाकिस्तानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ सौदी अरेबियाला गेले असून त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
    पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वात कुणी बाधा आणल्यास खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. नौदलाचे एक जहाज येमेनपर्यंत पोहोचले असून त्यांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे.
इरना या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, आज सकाळी इराणची मदत येमेनला पोहोचली, पण विमान कुठे उतरले होते हे सांगता आलेले नाही. सौदी अरेबियाच्या आघाडीने बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या विमानतळांवर बॉम्बफेक करून ते निकामी करून टाकले. इराणने पाठवलेल्या मदतीत १९ टन औषधे, वैद्यकीय उपकरणे व दोन टन अन्न यांचा समावेश आहे. इराणच्या रेड क्रिसेन्ट संस्थेने ही माहिती दिली असून हुथी हे इराणचे छुपे दोस्त आहेत, असा आरोप करण्यात येत आहे.
इराणने बंडखोरांना शस्त्रास्त्र मदतही केली असून इराण किंवा हुथी बंडखोरांनी ही बाब फेटाळली आहे. दरम्यान, तेथील भारतीयांना परत आणण्यासाठी भारताने लढाऊ जहाजे पाठवली असून सागरी चाच्यांची भीती असल्याने ही जहाजे इतर दोन जहाजांना संरक्षण देत आहेत. ही जहाजे दिजबौतीला जात आहेत. त्यांना तेथे पोहोचण्यास पाच-सहा दिवस लागणार आहेत, असे नौदलाचे उपप्रमुख पी.मुरूगेशन यांनी सांगितले. मुरूगेशन यांनी उपप्रमुखपदाचा कार्यभार आताच स्वीकारला आहे. नौदलाने ‘आयएनएस मुंबई’ ही विनाशिका व लढाऊ जहाज ‘आयएनएस तरकश’ तसेच कोचिन येथून इतर दोन जहाजे पाठवली आहेत.