गेले पाच महिने गजाआड असलेले सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना आपल्या मालमत्तेच्या विक्री संबंधातील वाटाघाटी करण्यासाठी तिहार तुरूंगाच्या सभागृहात खरेदीदारांशी बोलणी करण्याची मूभा देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश टी.एस.ठाकूर यांच्या खंडपीठाने ‘सहारा श्रीं’ना संभावित खरेदीदारांशी बोलणी करण्यासाठी तुरूंगाच्या सभागृहात येण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार ५ ऑगस्टपासून पुढील १० दिवस सुब्रतो रॉय यांना खरेदीदारांशी तिहार तुरूंगाच्या सभागृहात वाटाघाटी करता येणार आहे. रॉय यांच्यासोबत कारावासात असलेल्या सहारा कंपनीच्या इतर दोन संचालकांना देखील ही मुभा देण्यात आली आहे.
रॉय यांना ही वाटाघाटी ५ ऑगस्टपासून सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत करता येणार आहे. यामध्ये रॉय यांच्यासोबत त्यांचे दोन सचिवांनाही सहकार्य करण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
विधिवत जामीन मिळवण्यासाठी रॉय यांना सेबीकडे दहा हजार कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. त्यासाठी न्यूयॉर्क आणि लंडन येथील हॉटेल विकायची अनुमती मात्र त्यांना न्यायालयाने दिली आहे.