निर्भया बलात्कार आणि मृत्यू प्रकरणातील एक दोषी पवन गुप्ता याने नव्याने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे त्याने फाशी टाळण्यासाठी केलेल्या शेवटचा प्रयत्नही अयशस्वी ठरला आहे. दरम्यान, आता या प्रकरणी उद्या होणारी सर्व चार आरोपींची फाशी निश्चित मानली जात आहे.

पवन गुप्ताने या नव्या याचिकेत घटना घडली त्यावेळी आपण अल्पवयीन होतो असा दावा केला होता. त्याची हीच याचिका यापूर्वी हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली होती त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करताना पवनने यात दावा केला की, त्याच्या याचिकेवर हायकोर्टात योग्य प्रकारे सुनावणी घेतली गेली नाही आणि याचिका फेटाळण्यात आली.

त्याचबरोबर या याचिकेत त्यानं असाही तर्क मांडला की, दोषी विनय, पवन आणि अक्षय यांच्याकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर अद्याप सुनावणी प्रलंबित आहे. त्यामुळे २० मार्च रोजी सकाळी होणाऱ्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर निर्भयाच्या आईने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “कोर्टाने घटनेच्या दिवशी पवन अल्पवयीन असल्याचा दावा फेटाळला आहे. त्यामुळे पवनचा शेवटचा डावही निष्पभ्र झाला आहे. त्यामुळे आता उद्या चौघांनाही फाशीची शिक्षा होईलच. त्यामुळे उद्या निर्भयाला न्याय मिळेल म्हणजे मिळेलच.”