मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी याकूब मेमन याला फाशीची शिक्षा सुनावणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली असून, त्यांची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.
याकूबच्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरुद्ध करण्यात आलेली अंतिम याचिकेवर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सुनावणी केल्यानंतर ती फेटाळून लावणाऱ्या तीन सदस्यीय खंडपीठापैकी न्या. दीपक मिश्रा हे एक आहेत. त्यांच्या तुघलक रोडवरील निवासस्थानाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ बुधवारी धमकी देणारे एक पत्र सापडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पत्रातील भाषा अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, कुणीतरी निनावी पत्र पाठवून खोडसाळपणा केला असल्याची शक्यता त्यांनी सध्या तरी नाकारली आहे.
न्या. मिश्रा यांचे खासगी सुरक्षा अधिकारी सुरक्षा तपासणी करताना त्यांना हे पत्र सापडले. त्यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर विशेष आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) दीपक मिश्रा यांनी निवासस्थानाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. हे धमकी पत्र पाठवणाऱ्यांनी मिश्रा यांच्या निवासस्थानाची पाहणी केली असावी, असे मानले जात आहे.
न्या. मिश्रा यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले असून, त्यांच्या कार्यालयाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचे संशयितांना माहीत होते. निवासस्थानाच्या मागील बाजूला गर्द झाडी असून, कुणी कुंपणाजवळ पत्र फेकल्याचे कॅमेऱ्यांमध्ये दिसू शकत नसल्याचीही त्यांना कल्पना होती, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या घटनेनंतर दिल्ली पोलिसांशिवाय केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान येथे नेमण्यात आले आहेत. याशिवाय संपूर्ण नवी दिल्ली भागात दहशतवादविरोधी सुरक्षा कवायतही करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.