इटलीचे भारतातील राजदूत डॅनिअल मॅनकिनी यांनी देश सोडून जाऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. 
केरळच्या समुद्रात दोन भारतीय मच्छिमारांची हत्या केल्याचा आरोप असणाऱया इटलीच्या दोन नाविकांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी भारतात न पाठविण्याचा निर्णय इटलीतील सरकारने घेतला. मॅसिमिलीआनो लॅटोर आणि सॅल्वाटोर गिरोन अशी या नाविकांची नावे आहेत. या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटले. आरोपी नाविकांना भारतात परत न पाठविल्यास त्याचे गंभीर परिणाम इटलीला भोगावे लागतील, असा सज्जड इशारा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारी संसदेत दिला होता. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली.
सर्वोच्च न्यायालयाने इटलीचे राजदूत आणि आरोपी नाविकांना नोटीस पाठविली. आरोपी नाविकांनी देश सोडून जाण्यापूर्वी खटल्याच्या सुनावणीसाठी परत येण्याचे दिलेले आश्वासन का पाळले नाही, याचा तातडीने खुलासा करण्याचे आदेश नोटिसीत दिले आहेत. १८ मार्चपूर्वी त्यांनी आपली बाजू न्यायालयापुढे मांडावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. हा संपूर्ण प्रकार केंद्र सरकारने अतिशय गंभीरपणे घेतला असून, विविध पर्यायांचा विचार करण्यात येत असल्याचे ऍटर्नी जनरल यांनी न्यायाधीशांना सांगितले.