करोना महामारीचा कमी होणारा प्रादुभाव पाहून देशातील अनेक राज्यात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. २१ सप्टेंबर रोजी लॉकडाउनमध्ये मिळालेल्या दिलास्यानंतर काही राज्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी, (२ नोव्हेंबर) पासून काही राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात शाळा उघडण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असण्याची शक्यता आहे. कारण, करोना विषाणूच्या भितीमुळे पालक मुलांना शाळेत पाठवण्यास नकार देत आहेत. आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यात शाळा उघडल्या आहेत. त्याशिवाय देशातील केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयातील ९ वी ते १२ पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

आंध्र प्रदेश सरकारनं आजपासून करोनाच्या सर्व नियमांचं पालन करत शाळा सुरु केल्या आहेत. विद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळा अर्धा दिवसच चालतील. शिवाय एकदिवसाआड शाळा भरवण्यात येणार आहेत. प्रत्येक वर्गात फक्त १६ विद्यार्थीच असतील. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगशिवाय नियमित हात साफ करण्याचा नियमही करण्यात आला आहे.

सात महिन्यानंतर आजपासून उत्तराखंडमध्ये शाळा उघडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्यात फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. कारण त्यांची बोर्डाची परिक्षा होणार आहे. राज्य सरकारनं पत्रक काढत करोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर सर्व व्यवस्थित सुरु झालं तर पुढील काही दिवसांत इतर वर्गाच्या शाळाही टप्या टप्यानं सुरु करण्यात येणार आहेत.

आसाम सरकारनेही सोमवारपासून ऑफलाइन पद्धतीनं शाळा सुरु केल्या आहेत. इयत्ता सहावीपासून पुढील सर्व वर्ग सुरुल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्‍याच्या शिक्षण मंत्रालयानं, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विद्यार्थांना आयर्न आणि फॉलिक एसिडच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेश सरकारने आजपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु केले आहेत. केंद्राच्या नियामांनुसार त्यानुसार सर्व पालकांकडून लिखीत परमिशन अनिवार्य करण्यात आलं आहे. वरील सर्व राज्यांशिवाय केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय आजपासून सुरु होणार आहेत. पहिल्या टप्यात नववी ते बारावीपर्यंते वर्ग सुरु करण्यात आले आहेत. देशभरता १,२५० केंद्रीय विद्यालय आणि ६५० नवोदय विद्यालय आहेत.

या राज्यात शाळा राहणार बंद –
देशातील अर्धापेक्षा जास्त राज्यात शाळा बंदच राहणार आहेत. करोना विषाणू आणि सण उत्सवामुळे काही राज्यांनी नोव्हेंबरमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ओदिशा आणि तामिळनाडूने १६ नोव्हेंबरनंतर शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्‍थान सरकारनेही १६ नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर परिस्थिती पाहून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.