ऑस्ट्रेलियातील मोठे शहर असलेल्या सिडनी येथे गेल्या आठवडय़ापासून बॉम्ब ठेवल्याच्या अफवा उठवल्या जात असून आजही अफवांच्या मालिकेनंतर अनेक शाळा बॉम्बच्या भीतीने रिकाम्या करण्यात आल्या. सायंकाळी चार वाजता न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितले, की सिडनी येथे शाळा रिकाम्या करण्याची मोहीम पूर्ण करण्यात आली व अफवांबाबत तपास सुरू आहे. एका शाळेला आवाजी इलेक्ट्रॉनिक संदेशातून बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. पोलिस प्रवक्तयांनी सांगितले, की अनेक ठिकाणी शाळा रिकाम्या कराव्या लागल्या. असे असले तरी या अफवांनंतर चौकशी केल्यानंतर गंभीर असे काहीच आढळून आले नाही. शिक्षण विभागाने अफवानंतर पोलिसांना चौकशीत सहकार्य केले आहे.