14 July 2020

News Flash

शाळा आता मुलांसाठी सुरक्षित राहिल्या नाहीत- कैलाश सत्यर्थी

पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत घृणा निर्माण होते ही शरमेची बाब

फोटो सौजन्य एएनआय

सद्यस्थितीत शाळांमध्ये मुलांबाबत घडणाऱ्या घटना पाहता, शाळा या आता मुलांसाठी सुरक्षित राहिल्या नाहीत अशी खंत नोबेल पुरस्कार विजेते आणि सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यर्थी यांनी बोलून दाखवली. गुरुग्रामच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या सात वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करून त्याची हत्या करण्यात आली. तर दिल्लीच्या टागोर पब्लिक स्कूलमध्येही एका शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या दोन घटना आणि देशभरात घडणाऱ्या इतर घटना पाहता शाळा मुलांसाठी असुरक्षित होत चालल्या आहेत. आपण आपल्या मुलांना शाळांमध्ये सुरक्षित वातावरण देण्यात अयशस्वी होत चाललो आहोत, असे मत कैलाश सत्यर्थी यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.

शाळेत जाऊन प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे, देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी कायम आग्रही भूमिका घेतली. कारण शाळा ही मुलांसाठी घरानंतर सर्वात सुरक्षित जागा असते. मात्र सध्या समोर येणाऱ्या घटना असुरक्षिततेची भावना मनात निर्माण करणाऱ्या आहेत असेही सत्यर्थी यांनी म्हटले आहे.

देशभरात होणाऱ्या बाल तस्करी आणि बाल लैंगिक शोषणाच्या घटनांविरोधात लढा उभा करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच कैलाश सत्यर्थी यांनी ‘भारत यात्रा’ सुरू केली. सध्या समोर येणाऱ्या घटनांमुळे शिक्षणाबाबत आणि शिक्षण देणाऱ्या संस्थांबाबत पालकांच्या मनात घृणा निर्माण झाली, ही बाब आपल्या देशासाठी शरमेची आहे असेही सत्यर्थी यांनी स्पष्ट केले.

माझ्या भारत यात्रे दरम्यान मी एका बलात्कार पीडित मुलीला भेटलो. या मुलीवर शाळेतून घरी परतत असताना बलात्कार झाला होता. मी शाळेचे नाव घेताच, ती पीडित मुलगी थरथर कापू लागली. तसेच अस्वस्थही झाली, या मुलीचे आई वडीलही शाळेचे नाव काढताच अस्वस्थ झाले आणि ते त्यांच्या मुलीला शाळेत पाठवायला तयार नाहीत.

शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची सुरक्षा ही त्या त्या शाळेची नैतिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर शाळा प्रशासनाने सर्वाधिक भर दिला पाहिजे, मात्र आपल्या देशात असे होताना दिसत नाही. प्रत्येक विद्यार्थी घरुन शाळेत येईपर्यंत आणि शाळेतून घरी पोहचेपर्यंत त्याची सुरक्षा हा महत्त्वाचा निकष शाळेने जपला पाहिजे असेही मत सत्यर्थी यांनी व्यक्त केले.

‘सुरक्षित बालपण सुरक्षित भारत’ ही मोहिम हाती घेऊन या सगळ्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनेही प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्याचा बस ड्रायव्हर, कंडक्टर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई यांच्याशी संबंध येतोच येतो. या सगळ्यांची नेमणूक करतानाच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तर नाही ना? याची तपासणी प्रत्येक शाळा प्रशासनाने करायला हवी. तसेच विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद असायला हवा, असेल तर तो आणखी वाढयला हवा असेही मत कैलाश सत्यर्थी यांनी व्यक्त केले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2017 7:54 pm

Web Title: schools are no more safe for children says kailash satyarthi
टॅग Kailash Satyarthi
Next Stories
1 भुवनेश्वरमध्ये उड्डाणपूल कोसळून २ ठार १० जखमी
2 तुरुंगात जाण्याच्या भीतीने नितीश कुमार भाजपला शरण गेले: लालूप्रसाद
3 २०१९ पर्यंत राम मंदिर उभारले नाही तर…; दिगंबर आखाड्याच्या महंतांचा इशारा
Just Now!
X