पेशावरमध्ये तालिबान्यांनी लष्कराच्या शाळेवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद ठेवण्यात आलेली सदर शाळा हिवाळ्याच्या सुटीनंतर सोमवारी पुन्हा सुरू झाली. दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानातील बंद ठेवण्यात आलेल्या सर्व शाळा हिवाळ्याच्या वाढीव सुटीनंतर सोमवारी पुन्हा सुरू झाल्या.
सरकारने शाळांसाठी सुरक्षेचे काही निकष ठरविले असून ज्या शाळांनी या निकषांची पूर्तता केली आहे त्यांना सरकारकडून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मात्र काही शाळांनी सीसीटीव्ही बसविणे, शाळेच्या संकुलातील कुंपणांची उंची वाढविणे यांसारख्या निकषांची पूर्तता अद्यापही केलेली नाही, त्यांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. राहील शरीफ यांनी तालिबान्यांनी हल्ला केलेल्या शाळेला सपत्नीक भेट दिली आणि भेदरलेल्या लहान विद्यार्थ्यांची भेट घेतली. सकाळच्या सत्रात शरीफ यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि अभिमानाने राष्ट्रगीत गायले, असे लष्कराच्या प्रवक्त्याने ट्विट केले.
शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जवळपास २० सैनिक तैनात करण्यात आले होते आणि तेथे विमानतळाप्रमाणे सुरक्षाद्वारही उभारण्यात आले होते. शाळेचे नियमित शैक्षणिक सत्र १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी १७ जानेवारीर्प्यत शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.