प्राणवायूशिवाय सजीव जगू शकत नाहीत हे खरे असले तरी आदिम काळात प्राणी पाण्यामध्ये प्राणवायूशिवाय (ऑक्सिजन) राहू शकत होते किंवा अगदी थोडय़ा प्राणवायूवर ते जगत होते असे दिसून आले आहे, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीविषयीच्या सिद्धांताला आव्हान मिळाले आहे.
वातावरणात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन असल्याशिवाय पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माणच होऊ शकत नाही असा विज्ञानातील एक सिद्धांत  आहे. आताच्या संशोधनानुसार बाल्टिक समुद्रातील अतिपश्चिमेकडील डॅनिश जॉर्ड बेटांवर सापडलेल्या लहान सागरी स्पाँज प्राण्याला जगण्यासाठी व वाढीसाठी ऑक्सिजन लागत नाही. पृथ्वीवरील गुंतागुंतीचे सजीव कसे तयार झाले असावेत हे एक मोठे गूढ आहे. आदिम काळात जे प्रगत स्वरूपातील जीव होते त्यांची निर्मिती कशी झाली, ते कसे जगले असावेत याचे वैज्ञानिकांना अजूनही पूर्ण उत्तर मिळालेले नाही. ऑक्सिजनमुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी विकसित झाली असे एक उत्तर त्यावर दिले जाते. साधारण ६३० ते ६३५ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरील वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढत गेले असे संशोधकांचे म्हणणे आहेत. डेन्मार्कमध्ये सापडलेल्या साध्या सागरी स्पाँजच्या अभ्यासात असे दिसून आले की, केवळ ऑक्सिजनमुळे जीवसृष्टी टिकू शकली याचा फेरविचार करावा लागेल कारण अगदी कमी किंवा शून्य ऑक्सिजन पातळीवर स्पाँजसारखा जीव वाढू शकतो, हे दिसून आले आहे. आजच्या वातावरणात असलेल्या ऑक्सिजनच्या ०.५ टक्के इतकाच ऑक्सिजन असतानाही प्राणी जगू शकतात व वाढूही शकतात. आमच्या अभ्यासातून असे निष्पन्न झाले की, प्राण्यांच्या निर्मितीस ऑक्सिजनच्या कमी पातळीमुळे आडकाठी झालेली नाही असे युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्कमधील नॉरडिक सेंटर फॉर अर्थ इव्होल्यूशन या संस्थेचे पीएच डी विद्यार्थी डॅनियल मिल्स यांनी म्हटले आहे. प्राण्यांचा उदय हा वातावरणात जास्त ऑक्सिजन असताना झाला हा एक योगायोग होता. ऑक्सिजन व जीवसृष्टीची निर्मिती यांचा संबंध जोडणे तितकेसे योग्य नाही. आपल्या माहितीप्रमाणे प्राण्यांना जगण्यासाठी नेमका किती ऑक्सिजन लागतो याचा अभ्यास कुणी केलेला नाही. पृथ्वीवर जे पहिले प्राणी होते ते सागरी स्पाँजसारखेच होते. सागरी स्पाँजना आमच्या प्रयोगशाळेत ठेवले असता सध्याच्या वातावरणातील ऑक्सिजन पातळीच्या ०.५ टक्के ऑक्सिजन पातळीवर ते जगू शकले. प्राण्यांच्या जगण्यासाठी जितका ऑक्सिजन आवश्यक असतो त्यापेक्षा फार कमी ऑक्सिजन पातळी यात ठेवण्यात आली होती, असे मिल्स व कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे लुईस एम वॉर्ड यांनी सांगितले.