केयू लेव्हेन व युट्रेक्ट विद्यापीठातील संशोधन
सध्या दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने डिझेल वाहनांची नवीन नोंदणी बंद करण्याचे आदेशही दिले आहेत. डिझेलमुळे सर्वात जास्त कार्बन डायॉक्साईड वायू वातावरणात सोडला जातो हे खरे आहे, पण आता केयू लेव्हेन व युट्रेक्ट विद्यापीठातील वैज्ञानिकांनी नवीन पद्धतीने इंधनांची निर्मिती करण्याची प्रक्रिया शोधून काढली असून त्यात प्रदूषण अगदी कमी होईल असे डिझेल तयार करता येते. पण हे डिझेल प्रत्यक्ष वापरात येण्यास अजून पाच ते दहा वष्रे लागू शकतात कारण ते डिझेल वापरण्यासाठी मोटारींच्या रचनेतही बदल करावा लागेल. युरोपात तर अनेक देशांनी कालांतराने डिझेलचा वापर बंद करण्याचे ठरवले आहे.
इंधनाच्या निर्मितीत उत्प्रेरकांचा वापर केला जातो, त्यामुळे कच्च्या तेलाचे रूपांतर डिझेलमध्ये होते. डिझेलच्या बाबतीत सांगायचे तर त्यात दाणेदार असलेला उत्प्रेरक पदार्थ वापरला जातो, त्यामुळे कच्च्या पदार्थातील रेणू इंधन निर्मितीस म्हणजे डिझेलसाठी योग्य बनतात. उत्प्रेरक म्हणजे कॅटॅलिस्टचे अनेक उपयोग असतात. आताच्या संशोधनात वापरलेले उत्प्रेरक हे प्लॅटिनम धातू व सॉलिड स्टेट अॅसिड हे आहेत. डिझेल निर्मितीच्या प्रक्रियेत रेणू धातू व अॅसिड यांच्यावर मागेपुढे होऊन सारखे आदळत असतात, प्रत्येक वेळी हे रेणू या दोन घटकांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांच्यात बदल होत जातो व नंतर त्यांचा वापर डिझेल निर्मितीसाठी योग्य ठरतो. धातू व सॉलिड स्टेट अॅसिड शक्य तितके जवळ ठेवावे लागतात त्यामुळे ते लवकर डिझेल निर्मितीस योग्य ठरतात. आतापर्यंतच्या समजानुसार या दोन उत्प्रेरकातील अंतर कमी असेल तर ते जास्त चांगले मानले जाते, पण प्रा. जोहान मार्टेन्स व प्रा. क्रिन डे लाँग यांनी सांगितले की, हा गरसमज आहे. त्यांच्या मते दोन उत्प्रेरकातील अंतर काही नॅनोमीटरने वाढवले तर त्यातून ही प्रक्रिया जलद व अचूक होते. हा प्रयोग वारंवार केला असता आताचा उत्प्रेरक जवळ ठेवण्याने रासायनिक प्रक्रियेत फायदा होत असल्याचा समज चुकीचा असल्याचे दिसून आले. जर हे अंतर काही नॅनोमीटरने वाढवले तर प्रक्रिया जलद होते व स्वच्छ डिझेल तयार होण्यास मदत होते. सुरूवातीला आम्हाला आमचे विश्लेषण चुकीचे आहे असे वाटले होते पण नंतर ते बरोबर असल्याचे दिसून आले. मार्टेन्स यांच्या मते त्यांनी हा प्रयोग तीनदा केला व त्यात सध्याचा समज चुकीचा ठरला आहे. गेली पन्नास वष्रे डिझेल चुकीच्या पद्धतीने तयार केले जात आहे. नवीन डिझेलमुळे प्रदूषण फारच कमी होते व त्याचा वापर करून मोटारी चालवल्यास हवेत सूक्ष्ण प्रदूषके व कार्बन डायॉक्साईड कमी प्रमाणात मिसळतो. कालांतराने ही पद्धत डिझेलच्या औद्योगिक उत्पादनासाठी वापरता येईल पण त्याला ५ ते १० वष्रे लागतील. पेट्रोलियम आधारित इंधनात ही पद्धत वापरता येईल शिवाय जैवभारापासून पुनर्नवीकरणीय इंधनेही तयार करता येतील.