भारतात करोना व्हायरसचा कहर थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातले शास्त्रज्ञ हे करोनाविरोधतली लस शोधण्यासाठी वेगाने कार्य करत आहेत असं म्हटलं आहे. जानेवारीमध्ये आपल्या देशात करोनाच्या चाचण्या करण्यासाठी एकच लॅब होती. आता संपूर्ण देशात १३०० लॅब्स आहेत. तर देशभरात पाच लाख टेस्ट रोज होत आहेत. अशीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातल्या मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथील हायटेक लॅबचे उद्घाटन केले. त्यानंतर ते बोलत होते. आपल्या देशातले शास्त्रज्ञ करोनावर लस शोधण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत आहेत असंही मोदींनी म्हटलं आहे.

करोनाच नाही तर इतर प्राणघातक आजारांवरही ही लस उपयोगी ठरेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. करोना विरोधात लढण्याचा संकल्प घेऊन सगळा देश काम करतो आहे. सध्या रोज देशभरात ५ लाख चाचण्या होत आहेत. त्या चाचण्या १० लाखांपर्यंत घेऊन जाण्याचं आमचं उद्दीष्ट आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.