किरगिझस्तानची राजधानी बिश्केक येथे शांघाय सहयोग संघटनेच्या उद्घाटनप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफच्या अधिकृत ट्विटरवर हँडलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ते राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन करताना दिसत आहेत.

बैठकीदरम्यान हॉलमध्ये एससीओ सदस्य देशांचे प्रमुख एक एक करून आत प्रवेश करताना दिसत आहेत. त्यावेळी हॉलमध्ये उपस्थित असलेले अन्य देशांचे प्रमुख त्यांच्या सन्मानार्थ उठून उभे राहिले. परंतु यादरम्यान, पंतप्रधान इम्रान खान मात्र आपल्या जागेवर बसलेले दिसत आहेत. परंतु ज्यावेळी त्यांना केवळ आपणच बसलेलो आहोत याची जाणीव झाली त्यावेळी इतर सदस्यांबरोबर ते उठून उभे राहिले. यानंतर पुन्हा इतर सदस्य आपल्या जागेवर बसण्यापूर्वी इम्रान खान आपल्या जागेवर बसले.

यापूर्वीही त्यांनी राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन केले होते. सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 14 व्या ओआयसी परिषदेतही त्यांनी राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा प्रकार घडला होता. सौदी अरेबियाचे किंग सलमान बिन अब्दुलाजीज यांच्याशी इम्रान खान यांची चर्चा सुरू होता. तसेच त्यावेळी सलमान बिन अब्दुलाजीज यांचे अनुवादक इम्रान खांन यांनी दिलेली माहिती अनुवादीत करून त्यांना सांगत होते. परंतु अनुवाद संपण्यापूर्वीच इम्रान खान त्या ठिकाणाहून निघून गेले होते. त्यानंतर याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.