४ जून रोजी केरळात येणार; स्कायमेटचा अंदाज

मोसमी पाऊस (मान्सून) येत्या ४ जूनला केरळात येण्याचे चिन्हे आहेत. नेहमीच्या आगमनापेक्षा तो तीन दिवसांनी विलंबाने येणार असल्याचे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने मंगळवारी जाहीर केले आहे. मोसमी पावसाच्या आगमनापासून भारतात पावसाला सुरुवात होते. केरळात मोसमी पाऊस हा १ जूनपासून सुरू होत असतो. पण या वेळी तो उशिराने येणार आहे.

स्कायमेटने म्हटले आहे, की मोसमी पाऊस हा दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी असणार असून दीर्घकालीन सरासरी ९३ टक्के आहे. यात पाच टक्के कमी-अधिक होऊ शकते. याचा अर्थ मोसमी पाऊस ९३ टक्क्य़ांपेक्षा कमी राहील.

मान्सून अंदमान व निकोबार बेटांवर २२ मे रोजी येत असून त्यात अधिक-उणे दोन दिवस इतकी त्रुटी अंदाजात असू शकते. नैर्ऋत्य मोसमी पाऊस हा ४ जूनला केरळात येणार असून त्यात २ दिवस इतके कमी-जास्त होऊ शकते.

स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन सिंह यांनी सांगितले, की भारतीय द्वीपकल्पात मोसमी पावसाची आगेकूच संथगतीने होणार आहे. सर्व चार भागांमध्ये सरासरीच्या कमी पाऊस राहील. पूर्व, ईशान्य भारत व मध्य भारतात ईशान्य भारत व दक्षिण द्वीपकल्पापेक्षा कमी पाऊस राहील.

स्कायमेटच्या मते सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ही ५५ टक्के असून एल निनो या प्रशांत महासागराचा परिणाम मोसमी पावसावर होणार आहे. पूर्व व ईशान्य भारतात दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्के पावसाची शक्यता असून हा भाग सरासरीपेक्षा कमी पावसाच्या गटात मोडतो. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यात कमी पावसाचा धोका असून ईशान्य भारतात मध्यम पाऊस राहील, असे स्कायमेटचे म्हणणे आहे. वायव्य भारतात उत्तर भारतीय राज्यांचा समावेश असून तेथे दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता आहे. हा भाग सुरळीत व सरासरीपेक्षा कमी पाऊस याच्या सीमेवरील आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता असून पंजाब, हरयाणा, राजस्थान, दिल्ली राजधानी परिसर येथे तुलनेने पावसाचे प्रमाण कमी राहील. मध्य भारतात दीर्घकालीन सरासरीच्या ९१ टक्के पावसाची शक्यता असून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात या भागात पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी राहील. मराठवाडा व गुजरातमधील दुष्काळाच्या  झळा त्यामुळे तीव्र होण्याची शक्यता असून परिस्थिती बिकट होऊ शकते. दक्षिण द्वीपकल्पात साधारणपणे कमी-अधिक तशीच परिस्थिती राहील.

उत्तर कर्नाटकचा अंतर्गत भाग व रायलसीमा भागात पाऊसमान कमी राहणार असून केरळ, किनारी कर्नाटक या भागात पाऊसमान चांगले राहील, असे स्कायमेटने म्हटले आहे.