कडेकोट बंदोबस्त; एक लाखाहून अधिक पोलीस तैनात

 रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी मंगळवारी १९ जिल्ह्य़ांमध्ये कडेकोट बंदोबस्तामध्ये मतदान होणार आहे. मतदानासाठी लागणारी सर्व व्यवस्था करण्यात आली असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी एक लाखाहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

छत्तीसगड मंत्रिमंडळातील नऊ मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि सत्तारूढ भाजप आणि काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त जिल्ह्य़ातील १८ जागांसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.

छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांपैकी ६५ हून अधिक जागा पटकावून सलग चौथ्या वेळी सरकार स्थापन करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. तर काँग्रेस १५ वर्षांच्या विजनवासातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नामध्ये आहे.

मायावती यांच्या नेतृत्वाखाली बसपा, माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा जनता काँग्रेस छत्तीसगड (जे) आणि भाकप यांच्या आघाडीमुळे निवडणूक रणधुमाळीत रंगत निर्माण झाली आहे. मंगळवारी ७२ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी १०७९ उमेदवार रिंगणात आहेत.