करोना संपला म्हणून भारताने पहिल्या लाटेनंतर लगेच निर्बंध शिथिल केल्यानेच दुसरी लाट आली, त्यामुळे वाईट स्थितीस तोंड द्यावे लागत आहे, असे मत व्हाइट हाऊसचे वैद्यकीय सल्लागार व वरिष्ठ साथरोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फौची यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात सध्या दुसऱ्या लाटेमुळे करोना विषाणूचा संसर्ग वाढला असून आरोग्य कर्मचारी, लशी, औषधे व खाटा यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सेनेटच्या समितीसमोर बोलताना ते म्हणाले, की भारतात आता करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. पहिली लाट संपल्यानंतर आता करोना गेला असे समजून भारताने निर्बंध खूप आधीच शिथिल केले. त्यामुळे आता रुग्ण संख्या वाढली आहे.परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे. फौची हे अध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य सल्लागार आहेत. सेनेटच्या समिती प्रमुख पॅटी मरे यांनी सांगितले, की भारतातील कोविड लाटेने झालेली भीषण परिस्थिती पाहता इतर देशांमध्ये करोनाची साथ संपल्याशिवाय अमेरिकेतही ती संपणार नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. भारतातील करोनाची साथ ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ठोस असली पाहिजे याची जाणीव करून देणारी आहे. आगामी काळातील साथीतही आरोग्य व्यवस्थाच महत्त्वाची ठरणार आहे.

भारतातील परिस्थितीतून अमेरिका काय धडा शिकणार, असे मरे यांनी फौची यांना विचारले असता ते म्हणाले, कुठल्याही परिस्थितीला कमी लेखून चालणार नाही. सार्वजनिक आरोग्याच्या आघाडीवर आपली तयारी भक्कम असली पाहिजे. स्थानिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणखी कार्यक्षम करावी लागेल.

आपल्या देशाबाबतच नव्हे तर इतर देशांबाबत असलेल्या जबाबदारीचीही जाणीव ठेवली पाहिजे. विशेष करून जगाच्या लसपुरवठ्याकडे लक्ष दिले पाहिजे. विषाणू जगात कुठेही राहिला तरी तो अमेरिकेसाठी धोकादायक आहे. विषाणूचे उपप्रकार तयार होत असून त्यात भारतातील उपप्रकाराची बरीच चर्चा आहे. भारतातील विषाणूच्या साथीतून असे अनेक धडे घेता येण्यासारखे आहेत.   –  डॉ. अँथनी फौची, व्हाइट हाऊसचे वैद्यकीय सल्लागार

More Stories onकरोनाCorona
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second wave as india has already relaxed sanctions akp
First published on: 13-05-2021 at 00:08 IST