एसपीजी सुरक्षा हटवल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्या निवासस्थानी सुरक्षेमध्ये त्रुटी आढळून आली आहे. यावर त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी भाष्य केले आहे. संपूर्ण देशातल्या नागरिकांच्या सुरक्षेशीच तडजोड होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वढेरा यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे याबाबत मत व्यक्त केले आहे.

रॉबर्ट वढेरा म्हणतात, “हा प्रश्न केवळ प्रियंका, माझी मुलगी किंवा मुलगा अथवा गांधी परिवाराच्या सुरक्षेचा नाही. हा प्रश्न आपले नागरिक, विशेषत्वाने आपल्या देशाच्या महिलांना सुरक्षित ठेवण्याचा आणि सुरक्षित वाटण्याबाबतचा आहे. संपूर्ण देशातच सध्या सुरक्षेशी खेळ केला जात आहे. मुलींसोबत छेडछाड, दुष्कृत्यांचे प्रमाण वाढले आहे. आपण कुठल्या प्रकारचा समाज बनत चाललो आहोत. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. जर आपण आपल्या देशात आणि घरातच सुरक्षित नाही. रस्त्यावर सुरक्षित नाही, दिवसा किंवा रात्रीही सुरक्षित नाही. तर आपण कुठे आणि कशा प्रकारे सुरक्षित राहू शकतो?, असा सवालही त्यांनी केला आहे.

काल समोर आलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी सात अज्ञात व्यक्ती परवानगीशिवाय एका वाहनाने प्रियंका गांधी यांच्या लोधी इस्टेट येथील घराच्या आवारात घुसले होते. यामध्ये तीन पुरुष, तीन महिला आणि एका मुलीचा समावेश होता. हे लोक प्रियंका गांधी यांच्याजवळ जाऊन त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त करीत होते. दरम्यान, प्रियंका गांधी यांनी त्यांच्यासोबत शिष्टाचाराने चर्चा केली. त्यानंतर या लोकांनी प्रियंका यांच्यासोबत फोटो घेतले आणि ते निघून गेले.

या घटनेनंतर प्रियंका गांधींच्या कार्यालयाने हा प्रश्न सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला होता. एसपीजी सुरक्षा हटवल्यानंतर प्रियंका यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे म्हणणे आहे की, आपल्याला प्रियंका गांधींच्या निवासस्थानी घडलेल्या या घटना घडनेची माहिती नाही, याची माहिती मी घेईन आणि यावर भाष्य करेन.

प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची देखील एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतली आहे. त्यांना सध्या झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. २८ वर्षांनंतर गांधी कुटुंबीय सध्या एसपीजी सुरक्षेशिवाय आहेत.