सीनिअर्सनी रॅगिंगच्या नावाखाली केलेल्या अमानुष मारहाणीमुळे विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. केरळमधील इडुक्की येथील तंत्रज्ञान इन्स्टिट्यूटमध्ये हा प्रकार घडला आहे. विद्यार्थी पहिल्या वर्षात शिकत आहे. विद्यार्थ्याच्या पायाला गंभीर जखमा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तक्रारीच्या आधारे द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थ्याने आपल्याला जवळपास तीन तास मारहाण होत होती असं सांगितलं आहे.

घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना विद्यार्थी म्हणाला की, सीनिअर्सनी आपल्याला जबरदस्ती कॅम्पसच्या बाहेर जाण्यास सांगितलं होतं. नंतर त्यांनी मला एकाच हातात रॉड आणि मोबाइल फोन पकडण्यास सांगितलं. काहीही हातातून खाली पडता कामा नये अशी धमकीच त्यांनी दिली होती. नंतर त्यांनी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा मोबाइल पडला तेव्हा मारहाणीचा वेग अजून वाढला’.

नुकतंच अॅडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये नेहमीच रॅगिंग होत असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी रॅगिंगच्या भीतीपोटी हॉस्टेल सोडण्याची भीती वाटत असल्याचं सांगितलं आहे. ‘घटनेची माहिती मिळाल्यानंतर तीन सीनिअर विद्यार्थ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. चौकशी समिती नेमण्यात आली असून १५ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे’, अशी माहिती कॉलेज प्रशासनाने दिली आहे.