भारतात करोना व्हायसच्या लसीच्या चाचण्या सुरु करण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) ने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला सुधारित प्रोटोकॉल पाठवायला सांगितला आहे. सिरमने सीडीएससीओकडे लसीच्या चाचण्या सुरु करण्यासाठी परवानगी मागितली आहे. भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन करणार आहे.

जगातील वेगवेगळया देशात ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. सिरमला भारतातही या लसीच्या तिसऱ्या फेजची चाचणी करायची आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे या व्हॅक्सीनचे नाव आहे. सिरमने पाठवलेल्या प्रोटोकॉलचे तज्ज्ञांच्या समितीने मूल्यमापन केले. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

तज्ज्ञांच्या समितीने काही निरीक्षणे नोंदवली असून सुधारित प्रोटोकॉलमध्ये ती माहिती सादर करण्यास सांगितली आहे. “आमच्या तज्ज्ञांच्या समितीने सिरमने पाठलेल्या अर्जाचे सखोल विश्लेषण केले. त्यात ड्रॉप आऊट, आकडेवारी आणि रोगप्रतिकारक शक्ती संबंधीचे विश्लेषण असे विषय होते. हे एक व्यापक वैज्ञानिक विश्लेषण होते” असे आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कोविशिल्ड लसीची फेज दोन आणि तीनची मानवी चाचणी करण्यासाठी सिरमने २५ जुलै रोजी डीसीजीआयकडे परवानगी मागणारा अर्ज केला. एएनआयने हे वृत्त दिले होते. १६०० स्वयंसेवकांवर लसीचे मानवी परीक्षण करण्याची सिरमची योजना आहे.

लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात पहिल्या फेजमध्ये ऑक्सफर्डच्या लसीचे निष्कर्ष खूपच उत्साहवर्धक असल्याचे म्हटले आहे. ऑक्सफर्डच्या लसीने तिसऱ्या फेजचा अडथळा ओलांडला तर भारतीयांना ही लस नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध होऊ शकते. कारण सिरमच्या पुण्यातील प्लांटमध्ये या लसीचे उत्पादन होणार आहे.