अहमदाबादमध्ये एका व्यक्तीस ५० पेक्षा जास्त तरुणींचे लैंगक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद सायबर सेलच्या म्हणण्यानुसार, संदीप मिश्रा उर्फ विहान शर्मा असं नाव असलेल्या या व्यक्तीने एका लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर (मॅट्रिमोनिअल साईट)आपण आयआयएम अहमदाबाद येथून पदवीधर असून, गुगलमध्ये एचआर मॅनेजर असल्याचं दर्शवलं व त्यानंतर तरुणींसोबत शारीरिक संबंध निर्माण केले आणि त्यांना लुटलं.  पोलिसांनी या व्यक्तीकडून तब्बल ३० सिम कार्डसह चार मोबाइल आणि चार बनावट ओळखपत्रं देखील हस्तगत केली आहेत.

यासंबधी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, संदीप मिश्रा हा मॅट्रिमोनिअल साईटवर विहान शर्मा, प्रतिक शर्मा व आकाश शर्मा अशा विविध नावांचा वापर करून वेगवेगळी प्रोफाईल तयार करायचा. प्राथमिक तपासात हे उघड झाले की, त्याने मॅट्रिमोनिअल साईटवर खोटे प्रोफाईल तयार करून स्वतःचा पगार चक्क ४० लाख असल्याचं सांगितलं आहे. सुरूवातीस तो तरुणींसोबत शारीरिक संबंध निर्माण करायचा आणि त्यानंतर त्यांच्याकडील पैस उकळून त्यांना सोडून द्यायचा. एवढच नाहीतर त्याने तरुणींसोबत सेक्स करतानाचे व्हिडिओ देखील शूट केले आहेत. यातील काही व्हिडिओ त्याच्या जप्त करण्यात आलेल्या मोबाइलमध्ये आढळून आले आहेत. इंडिया टुडेने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

संदीपने आयआयएम अहमदाबाद येथून पास झाल्याचे बनावट पदवी प्रमाणपत्र देखील बनवले आहे. तसेच, अहमदाबाद, उज्जैन, ग्वाल्हेर, गोवा आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमधील तरूणींना देखील त्याने फसवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.