‘रईस’ चित्रपटासाठी रेल्वेने प्रवास करणा-या अभिनेता शाहरुख खानला बघण्यासाठी त्याच्या चाहत्यांची गर्दी झाली होती. मात्र शाहरुखच्या चाहत्यांची गर्दी एका व्यक्तीच्या जीवावर बेतली. बडोदा स्थानकात गर्दीत मृत्यू झालेला व्यक्ती शाहरुख खानला नव्हे तर एका नातेवाईकाला भेटण्यासाठी रेल्वे स्थानकावर आला होता अशी माहिती उघड झाली आहे.

शाहरूख आपल्या टीमबरोबर ऑगस्ट क्रांती एक्स्प्रसेने मुंबईहून दिल्लीकडे रवाना झाला. चित्रपटाच्या प्रोमोशनचा हा नवीन फंडा होता. सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास बडोदा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर रेल्वे १० मिनिटे थांबली होती. या वेळी शाहरूखला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. रेल्वे निघाल्यानंतर चाहतेही रेल्वेबरोबर पळू लागले. त्यामुळे धावाधाव सुरू झाली. यात चेंगराचेंगरीत फरहीद खान याचा मृत्यू झाला होता.

फरहीद हा शाहरुखची एक झलक बघण्यासाठी स्थानकावर गेल्याची चर्चा होती. मात्र फरहीदच्या नातेवाईकांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. फरहीद हा शाहरुख नव्हे तर एका नातेवाईकाला बघण्यासाठी बडोदा रेल्वे स्थानकावर आला होता असे त्याच्या नातेवाईकांना दिली आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीदेखील या घटनेची दखल घेतली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकांना या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. रईस या चित्रपटानिमित्त शाहरुखने केलेला हा रेल्वेप्रवास पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे. प्रत्येक स्थानकावर शाहरुखची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. या गर्दीला आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.