सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे गेल्या ३६ दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या महिलांपैकी काहींनी मंगळवारी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नायब राज्यपालांनी भेटीसाठी वेळ देऊन आमचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी इच्छाही या महिलांनी व्यक्त केली आहे.

“आम्ही इथेच बसलो आहोत आणि इथेच बसून राहणार. आम्ही नायब राज्यपालांकडे गेलो होतो. त्यांनी आम्हाला मान देत आमचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी झालेल्या चर्चेत आम्ही त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला मुलासारखे आहेत. तरी असं काय झालं आहे की आई रस्त्यावर आहे आणि मुलाला आपल्या आईला भेटायलाही वेळ नाही. जोपर्यंत सीएए, एनआरसी आणि एनपीआर मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही,” अशी प्रतिक्रिया नायब राज्यपालांना भेटलेल्या महिलांपैकी एक असणाऱ्या बिलकीस या वृद्ध महिलेने दिली आहे.

भेटायला बोलवलेलं म्हणून गेलो होतो…

मंगळवारी शाहीन बाग येथे आंदोलन करणाऱ्या चार वयस्कर महिलांच्या प्रतिनिधी मंडळाने बैजल यांची भेट घेतली. यामध्ये शर्वरी, नूर बेगम, बिलकीस आणि अन्य एक वृद्ध महिलेचा समावेश होता. यावेळी समाजिक कार्यकर्ता सैयद तासिर अहमद सुद्धा या महिलांबरोबर नायब राज्यपालांना भेटले. बैलज यांनीच आपल्याला भेटण्यासाठी बोलवले होते म्हणून आपण गेलो होतो असं या महिलांनी सांगितले. “जोपर्यंत एनआरसी आणि सीएए मागे घेतलं जात नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर हटणार नाही. असं आम्ही नायब राज्यपालांना सांगितलं आहे,” असं या महिला भेटीनंतर म्हणाल्या.

जे सांगायचंय ते सांगून आलोय

“जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी शपथ आम्ही घेतली आहे. आम्हाला मरणाची भिती नाही. काहीही झालं तरी रस्त्यावरुन आम्ही उठणार नाही. आम्ही रस्त्यावर येऊन प्रसारमाध्यमांसमोर आमचे म्हणणे मांडले त्याचप्रमाणे आम्ही नायब राज्यापालांसमोर आमचे म्हणणे मांडले. आम्ही केवळ आमचे मत मांडण्यासाठी नायब राज्यापालांकडे गेलो होतो. जे सांगायचं होतं ते सांगून आलोय. त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,” असं शर्वरी यांनी सांगितलं.

रस्ता रोको करणार…

सैयद तासिर यांनाही नायब राज्यपाल बैजल यांच्याबरोबर काय चर्चा झाली याची माहिती दिली. “जोपर्यंत संविधानविरोधी कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहणार आहे असं आम्ही स्पष्टपणे नायब राज्यपालांना सांगितलं आहे. २९ जानेवारीला आम्ही रस्ता रोकोही करणार असल्याचेही आम्ही सांगितले आहे,” असं तासिर म्हणाले. यावर बैजल यांनी तुमचे म्हणणे आपण गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत पोहचवू असं आश्वासन या महिलांना दिलं आहे.

निर्णय आमच्या विरोधात आला तर…

सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाबद्दल बोलताना तासिर यांनी, “आम्ही मागील ३७ दिवसांपासून रस्त्यावर बसून आहोत. पण आम्हाला कोणीच येथून उठवलं नाही. याचाच अर्थ असा की आम्ही कोणतेही चुकीचे काम करत नाही. आता शाहीन बागप्रमाणे देशातील वेगवगेळ्या ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. सर्वोच्च न्यायलय आमची बाजू ऐकून घेईल अशी अपेक्षा आहे. जर निर्णय आमच्या विरोधात आला तर आम्ही रस्त्यावरुन उठणार नाही,” असं सांगितलं.