दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मशिदेचे शाही इमाम बुखारी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहित मशिदीच्या दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे. शुक्रवारी आलेल्या वादळामुळे मशिदिच्या एका मिनारचा स्लॅब कोसळला. यामुळे खालच्या फरशीचेदेखील नुकसान झालं आहे. बुखारी यांनी पडलेल्या दगडांचे, झालेल्या नुकसानाचे आणि मिनारच्या जीर्ण अवस्थेचे फोटोही त्यांनी या पत्रासोबत जोडले आहेत.

भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) स्मारकाची पाहणी करावी आणि आवश्यक दुरुस्तीचे काम करावे यासाठी सय्यद अहमद बुखारी यांनी रविवारी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. ४ जून रोजी आलेल्या वादळात १७ व्या शतकात बांधलेल्या या ऐतिहासिक मशिदीचा एक मिनार खराब झाला आहे.

“जामा मशिदीमध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. गेल्या ५० वर्षांपासून मिनारांच्या दुरुस्तीसाठी कोणतंही काम करण्यात आलं नाही. दुरुस्तीचे काम कधी कधी करण्यात येत पण मशिदिची आता भारतीय पुरातत्व विभागाने पाहणी करणे आवश्यक आहे. स्मारकाचे अनेक दगड जीर्ण अवस्थेत आहेत आणि बर्‍याचदा ते खाली पडतात. कालदेखील मिनारवरुन काही दगड पडले, परंतु लॉकडाऊनमुळे मशिद बंद असल्याने मोठा अपघात टळला”, असे बुखारी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

शाहजानने १६५६ मध्ये केली होती जामा मिशिदीची निर्मिती

ऐतिहासिक जामा मशिदीची देखभाल करण्याची जबाबदारी दिल्ली वक्फ बोर्डावर आहे. ही मशिद मुघल शासक शाहजानने १६६५ मध्ये बांधली होती. शुक्रवारी, ६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मशिदीच्या एका मिनारमधून लाल दगड पडला. यामुळे मशिदीच्या समोरच्या भागातही यामुळे नुकसान झाले.