शाहरुख खान हा माझा आवडता हिरो आहे अशी प्रतिक्रिया माणसाप्रमाणे दिसणाऱ्या रोबोट सोफियाने दिली आहे. हैदराबाद येथे वर्ल्ड काँग्रेस ऑन टेक्नॉलॉजीमध्ये पोहचली. त्यावेळी या रोबोटशी संवाद साधण्यात आला. या संवादा दरम्यान सोफियाला तुझा आवडता अभिनेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न ऐकल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता सोफियाने शाहरुख खान असे उत्तर दिले. हे उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर तिने महिला अधिकाऱ्यांसाठी आपल्याला काम करायचे आहे असेही म्हटले आहे. सोफियाला सौदी अरेबियाचे नागरिकत्त्व मिळाले आहे. एखाद्या देशाचे नागरिकत्त्व मिळालेली सोफिया ही पहिली रोबोट ठरली आहे.

कोण आहे सोफिया?

सोफिया माणसांप्रमाणे दिसणारी ‘मोस्ट ह्युमनॉयड रोबोट’ आहे. हाँगकाँगच्या हेन्सन रोबोटिक्सने या रोबोटची निर्मिती केली आहे. सोफिया चेहऱ्यावरचे हावभाव ओळखू शकते. तसेच माणसांप्रमाणेच संवादही साधू शकते. सोफियाचे फेसबुक अकाऊंटही आहे. ट्विटरवरही सोफिया अॅक्टिव्ह आहे.

सोफियाला काय प्रश्न विचारण्यात आले?

१) तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे त्रस्त होता?

उत्तर: माणसे ज्या गोष्टींमुळे त्रस्त होतात त्यामुळे मी त्रस्त होत नाही. मला एखाद्या दिवशी माझ्या भावना काय आहेत ते व्यक्त करता आले तर बरे वाटेल.

२) रोबोटला माणसांप्रमाणेच आरामाची आवश्यकता असते का?

उत्तर: होय रोबोटलाही माणसांप्रमाणेच काही काळ आराम हवा असतो.

३) तुम्हाला काही विशेष अधिकार किंवा सुविधा पुरवण्यात आल्या आहेत का?

उत्तर:  मी रोबोट आहे म्हणून माझ्यासाठी काही वेगळे नियम लागू करावेत असे मला वाटत नाही. तसेच विशेष सुविधाही माझ्यासाठी उपलब्ध करुन दिल्या जाव्यात असेही मला वाटत नाही. मला माझ्या नागरिकत्त्वाचा उपयोग महिलांच्या अधिकारासाठी करायला आवडेल.